Wed, May 27, 2020 17:40होमपेज › Goa › शहीद जवानांबाबत चेल्लाकुमार यांचे घाणेरडे राजकारण 

शहीद जवानांबाबत चेल्लाकुमार यांचे घाणेरडे राजकारण 

Published On: Feb 28 2019 1:13AM | Last Updated: Feb 28 2019 1:13AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार हे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे घाणरडे राजकारण  करीत असून पाकिस्तान सारखे प्रश्‍न विचारत आहेत. त्यांचे वक्‍तव्य हे खालच्या दर्जाचे आणि दुर्दैवी असून त्यांचा भाजप निषेध करीत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी पणजी भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

 शर्मा म्हणाल्या, की  पुलवामा भीषण हल्ल्याची  ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली असताना डॉ. चेल्लाकुमार या हल्ल्यात शहीद झालेल्यांचा अपमान करीत आहेत. जवानांच्या मृतदेहांवर काँग्रेस घाणरडे राजकारण करीत असून ते पुन्हा पाकिस्तानच्या बाजूने विधाने करीत आहेत. चेल्लाकुमार दहशतवाद्यांना ‘क्‍लीन चीट’ देत आहेत का, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. याआधी काँग्रेसचे एक नेते पाकिस्तानच्या पंतप्रधानांची गळाभेट घेण्यास गेले होते, याची लोकांना विसर पडलेला नाही. चेल्लाकुमार यांनी आपल्या विधानाबाबत देशाची माफी मागावी आणि सदर वादग्रस्त विधान मागे घ्यावे , अशी भाजपची मागणी  असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे खरे देशभक्‍त असतील तर त्यांनी चेल्लाकुमार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून हटवावे. तसेच त्यांच्याकडे असलेले काँग्रेस सरचिटणीसपदही काढून घ्यावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर यांनी केली. पत्रकार परिषदेत भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे, दामू नाईक आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर आदी उपस्थित होते.