Mon, May 25, 2020 13:53होमपेज › Goa › ‘हुर्राक’ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

‘हुर्राक’ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : विशाल नाईक

औषधी गुणधर्मप्राप्त असलेल्या लोकप्रिय काजूच्या मद्याला पेटंट मिळून अनेक वर्षे लोटली आहेत, पण हवी तशी जाहिरात आणि बाजारपेठ न मिळाल्याने हुर्राक आणि फेणी गोव्यापुरतीच सीमित राहिली होती. अखेर या काजूच्या मद्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचे मार्ग खुले झाले असून ‘हवाई अमेरिका’या राज्याशी सामंजस्य करारानंतर गोव्याचे हुर्राक आणि फेणी अमेरिकेत दाखल होणार आहे, अशी माहिती कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

मंत्री गावडे  म्हणाले की, येत्या 22 जून रोजी हवाई अमेरिका आणि गोवा कला आणि संस्कृती खाते यांच्यात सामंजस्य करार होणार असून या कराराच्या माध्यमातून राज्यातील पारंपरिक व्यवसाय, कला आणि संस्कृती, व्यापार तसेच पर्यटन यांचे आदान-प्रदान होणार आहे. या माध्यमातून गोव्याच्या परंपरिक काजूच्या मद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. काजूपासून दारू काढणे हा गोमंतकीयांचा अत्यंत जुना आणि पारंपरिक व्यवसाय आहे.पूर्वजांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय सुरू केला होता. पण आता विविध समस्यांमुळे हा व्यवसाय लुप्त होत चाललेला आहे. प्रियोळ, सांगे, काणकोण, केपे अशा भागात काजूपासून दारू काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आजही जोमात सुरू आहे.

काजू गोळा करण्यासाठी कामगार मिळत नाहीत, ही मोठी समस्या आहे.हा व्यवसाय केवळ दोन ते अडीच महिन्यांचाच असल्याने अल्प दरात हंगामी कामगार मिळणे शक्य होत नाही. परिणामी मोठा मोबदला देऊन कामगार घ्यावे लागत आहेत. नुकसान सोसूनसुद्धा हा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवणार्‍या लोकांना सरकारने मदत करण्याची गरज आहे, असे मंत्री गावडे म्हणाले. 

या कराराच्या माध्यमातून व्यवसाय, पारंपरिक संस्कृती, कला आणि संस्कृती याचे प्रोमोशन आणि जाहिरात होणार आहे. शिवाय संस्कृती आणि व्यवसायाचे आदान-प्रदान होण्यासही मदत मिळणार असल्याचे गावडे म्हणाले. गोवा-हवाई (अमेरिका) यांच्यातील सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांतील देशांतर्गत उत्पादन, कला, संस्कृती, व्यवसाय, आदींचे आदान-प्रदान होणार आहे. यात प्रामुख्याने पर्यटन, आणि पारंपरिक व्यवसाय यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आपण पेडणे तालुक्यातील मद्य उत्पादकांची भेट घेतलेली आहे.प्रियोळ मतदारसंघात चार ठिकाणी व्यवसाय सुरू असून त्यांचीही भेट घेतलेली आहे. सांगे, काणकोण, केपे आदी मतदारसंघांत  मद्य निर्मिती करणारे असंख्य लोक आहेत. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असेही गावडे म्हणाले.

 

Tags : Margao, Margao news, Cashew wine, 


  •