Sun, May 31, 2020 14:34होमपेज › Goa › सार्दिन, एल्विस यांचे अर्ज दाखल

सार्दिन, एल्विस यांचे अर्ज दाखल

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:30AM
मडगाव : प्रतिनिधी 

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे लोकसभा उमेदवार फ्रान्सिस सार्दिन आणि ‘आप’चे उमेदवार एल्विस गोम्स यांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शन करून मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी अजित रॉय यांच्याकडे सादर केले.

खाण व्यवसाय, कोळसा प्रदूषण, मत्स्योद्योग अशा विषयांवर सरकार आणि दोन्ही विद्यमान खासदार अपयशी ठरले असून लोकांचा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्‍त केला.  

सत्ताधारी सरकारच्या विश्वासघातकी भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या जनतेने सरकारचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाला पाठिंबा देणे सुरू केले आहे, असे आपचे एल्विस गोम्स यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले. 

दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांची रॅली काढून शक्‍तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यलयाकडून रॅली काढली होती. या रॅलीत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत,कुंकळ्ळीचे क्लाफासियो डायस, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, नुवेचे आमदार विल्फ्रेड डीसा, काणकोणचे आमदार इजिदोर फेर्नांडिस,फोंड्याचे आमदार रवी नाईक, ताळगावच्या जेनिफर मोन्सेरात, केपेचे नागराध्यक्ष दयेश नाईक, तसेच दक्षिण गोव्यातील काँगेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सार्दिन यांच्याबरोबर केवळ चार जणांना आत सोडण्यात आले. यात बाबू कवळेकर, दिगंबर कामत, इजिदोर फर्नांडिस, गिरीश चोडणकर यांचा समावेश होता.

पत्रकारांशी बोलताना सार्दिन यांनी सांगितले की, सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले  आहे.आपल्याला  काँग्रेसच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यास राज्यातील जनतेला भेडसावणारे सर्व विषय आम्ही सोडवणार आहोत. भाजपने खाण विषयावरून लोकांची फसवणूक केली आहे. दिल्लीत सुमारे एक हजार खाण अवलंबितांनी आंदोलन केले होते. त्यांना भेटण्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नव्हता. वास्कोतील कोळसा प्रदूषणाचा विषय भाजपला सोडवता आला नाही. आम्हाला मुरगाव पोर्टचे विस्तारीकरण झालेले हवे आहे, पण ते लोकांच्या पोटावर पाय ठेवून नव्हे, असे सार्दिन म्हणाले. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे, तो हाणून पाडला जाणार आहे. 

आपण खासदार असताना बुल ट्रॉलरच्या माध्यमातून मासेमारी करण्यास  बंदी आणली होती. मासळीची पैदास घटतेय याला बुल ट्रॉलर्सद्वारे होणारी मासेमारी कारण  आहे. आपण निवडून आल्यास हे सर्व विषय सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्याला जनतेने तीनवेळा निवडून दिले होते. यावेळीही लोक आपल्याला निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार बाबू कवळेकर म्हणाले की, भाजपने खोटारडेपणा आणि लोकांची दिशाभूल करुन दक्षिण गोव्याची लोकसभेची जागा मिळवली होती. खासदार सावईकर यांनी लोकांना दिलेली आश्वासने त्यांना पाळता आली नाहीत. खाण विषयावरून लोकांची फसवणूक केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपॉईंटमेंट घेण्यासाठी खासदारांना पाच वर्षाचा अवधी लागला असे ते म्हणाले. निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली पण या भेटीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाला वगळले. खाणविषयीची स्थिती काय आहे, हे आम्हला समजू नये म्हणून आम्हाला मुद्दाम  डावलण्यात आले, असा आरोप कवळेकर यांनी केला.

दिगंबर कामत सरकार राज्यात असताना काँग्रेसने चारवेळा खाण विषयावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. लोकांना सत्य परिस्थिती समजून आली आहे, असे सांगून त्यामुळे दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दिगंबर कामत यांनी सांगितले की, आपण मुख्यमंत्री असताना आणि सार्दिन खासदारपदी  असताना हाज यात्रेसाठी थेट दाबोळी विमानतळावरून विमान सोडण्यात आले होते. आज मांडवीवरील पूल तयार झाला आहे, पण सात वर्षे खितपत पडलेले जिल्हा इस्पितळाचे काम काही पूर्ण झालेले नाही.

दक्षिण गोव्यासाठी जिल्हा इस्पितळ आणि जिल्हाधिकारी संकुल असे दोन प्रकल्प आपण सुरू केले होते.जिल्हाधिकारी इमारतीला पांढरा हत्ती म्हणून टीका केली जात होती. आज या इमारतीचा फायदा सर्व लोकांना होत आहे. जिल्हा इस्पितळाच्या विषयात केवळ तारखा दिल्या जात आहेत. या निवडणुकीत हे सर्व मुद्दे लोकांसमोर मांडले जातील, असेही त्यांनी सांगितले. गिरीश चोडणकर यांचेही यावेळी भाषण झाले.