Fri, May 29, 2020 22:39होमपेज › Goa › मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

Published On: May 25 2019 2:08AM | Last Updated: May 27 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल केले जाणार असून खात्यांचेही नव्याने वाटप केले जाणार आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन येत्या जुलै महिन्यात घेतले जाणार असून तारखांच्या निश्‍चितीसाठी सहकारी पक्षांच्या आमदारांसोबत चर्चा केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य विधानसभेत भाजपा आघाडी आता बलवान झाली असून पुढील तीन वर्षे जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी काम करणार आहे. मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांचा अजूनही भाजपा आघाडी सरकारला पाठिंबा असून त्यांनी पाठिंबा मागे घेतलेला नाही. 

डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील महिलांसाठी असलेली गृहआधार योजना बंद झाली नसून काही तांत्रिक कारणांमुळे आणि आचारसंहितेमुळे निधीचा विनियोग करण्यास वेळ लागला. गृहआधार आणि लाडली लक्ष्मी योजनांची फाईल आपण दोन दिवसांत हातावेगळी करणार असून निधीचे लवकरच वाटप केले जाणार आहे.

निवडणुकीतील यशापयशाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पंचवीस वर्षे भाजपकडे असलेला पणजी विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर यांचा पराभव झाल्याने खेद वाटतो. या दोन्ही जागा भाजपला पुन्हा जिंकायच्या असून त्यासाठी संघटनात्मक काम वाढविण्याचे काम हाती घेतले जाईल.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, लोकसभेचे दोन मतदारसंघ आणि विधानसभेच्या चार मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला केलेल्या मतदान व सहकार्याबद्दल आपण आभार मानतो. विधानसभा आणि लोकसभेच्या एकेक जागा भाजपने गमावल्याचे आम्हाला दु:ख झाले आहे. पणजीत आणि दक्षिण गोव्यात आम्ही कमी पडलो असून त्याबाबतचे पूर्ण विश्लेषण केले आहे. 

उत्पल पर्रीकर यांना पणजीत उमेदवारी दिली असती तर फरक पडला असता की नाही, हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. पण उमेदवारी पक्षाचे केंद्रीय नेते निश्‍चित करत असून त्यावर आपण काही बोलणे संयुक्तीक ठरणार नाही. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात नरेंद्र सावईकर या सक्रिय खासदाराचा का पराभव झाला, यावरही आम्ही विचार करत आहोत. सावईकर हे कायम लोकसभा मतदारसंघात फिरायचे व त्यांचा लोकांसोबत संपर्क असायचा. त्यामुळे त्यांच्या पराभवाविषयी खेद वाटत असल्याचे सावंत म्हणाले. 

खासदार श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पाचव्यांदा जिंकण्याचा विक्रम केला. त्याविषयी आम्हाला खूप आनंद वाटतो. उत्तरेत भाजपला 57 टक्के मते मिळाली व काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना फक्त 38 टक्के मते प्राप्त झाली आहेत. म्हापसा मतदारसंघातून जोशुआ डिसोझा हे राज्यातील सर्वात युवा आमदार म्हणून निवडून आले असल्याने अभिमान वाटत आहे. देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होणार असून आपण व अन्य आमदार-मंत्री शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, दक्षिण गोव्यात भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मगोच्या असहकार्यामुळे भाजपला फटका बसला असे म्हणता येणार नाही. केवळ मडकई मतदारसंघातच आमची आघाडी कमी झाली. अन्य काही मतदारसंघांमध्येही आम्हाला अपेक्षेपेक्षा थोडी कमी मते मिळाली. त्यात वास्को, मडगाव, सावर्डे आदी मतदारसंघांचा समावेश होतो. केवळ एकाच कारणामुळे पराभव झाला असे नसून त्याला विविध कारणे आहेत. खनिज खाण बंदीचा उत्तर गोव्यात काहीच परिणाम जाणवला नाही. मात्र, दक्षिणेतील खाणपट्ट्यात भाजपला थोडा विरोध झाला.

‘पराभवाची मीमांसा करणार’ 

मुख्यमंत्री म्हणाले की, आपण लोकसभा आणि पोटनिवडणूक निकालांचा विचार केला आहे. भाजपचे पणजीत काय चुकले ते आम्हाला पहावे लागेल. थोडी वेगळी पावले उचलावी लागतील. लोकसभा निवडणुकीवेळी पणजीतून भाजपला आघाडी मिळाली पण विधानसभा पोटनिवडणुकीत मते कमी पडली, यावर विचार करावा लागणार असून पराभवाची मीमांसा करणार आहे. मांद्रे मतदारसंघ पुन्हा भाजपने जिंकला. म्हापशातही आम्ही जिंकलो आणि शिरोड्यातही विजय मिळवला. शिरोड्यात काही जणांनी मतदारांना आमिषे दाखविण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी भाजपला कौल दिला.