Mon, May 25, 2020 11:03होमपेज › Goa › म्हादई पर्यावरण दाखल्याची मुख्यमंत्र्यांना पूर्वकल्पना

म्हादई पर्यावरण दाखल्याची मुख्यमंत्र्यांना पूर्वकल्पना

Last Updated: Nov 01 2019 1:23AM
पणजी : प्रतिनिधी
म्हादईवरील कळसा भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकला केंद्र सरकारकडून दिलेल्या पर्यावरण दाखल्याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. म्हादईप्रश्‍नी काँग्रेसकडून राज्यभरात जागृती केली जाणार असून याची सुरुवात शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी पेडणे येथून सकाळी 11 वाजता केली जाईल. यावेळी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदनदेखील सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चोडणकर म्हणाले, म्हादईवरील कळसा भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकला केंद्र सरकारने पर्यावरण दाखला दिला. हा दाखला देण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना कल्पना देण्यात आली होती. भाजप सरकारकडून म्हादई विषयावर राजकारण केले जात असून यात गोव्याचा बळी गेला आहे. त्यामुळे म्हादईबाबत मुख्यमंत्र्यांनी खरे काय ते जनतेसमोर मांडावे. विनाकारण विधाने करुन दिशाभूल करु नये.म्हादई गोव्याचा प्राण आहे. केंद्रात तसेच राज्यात भाजप सरकार असून त्यांनी म्हादईप्रश्‍नी तोडगा काढावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

म्हादईबाबत काँग्रेस पक्षाकडून तालुका पातळीवर नागरिकांमध्ये रॅलीव्दारे जागृती केली जाणार असून त्याची सुरवात आजपासून पेडणे येथून केली जाईल. 5 नोव्हेंबर रोजी वाळपई, 6 नोव्हेंबर रोजी डिचोली, 8 नोव्हेंबर रोजी म्हापसा तर 12 नोव्हेंबर रोजी पणजीत जागृती केली जाईल. दुसर्‍या टप्प्यात ही जागृती पथनाट्याव्दारे केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

गोवा सरकार अमली पदार्थ व्यवहारांना आळा घालण्यास अपयशी ठरले आहे. गोव्यात अमली पदार्थांची विक्री होत नसल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत कळंगुट पोलिसांनी 3 कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्‍त केला. मंत्री मायकल लोबो यांनी यापूर्वी गोव्यात अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा आरोप केला होता. परंतु त्याची सरकारकडून दखल घेण्यात आली नव्हती. अमली पदार्थ यापूर्वी केवळ किनारी भागांत मिळायचा. मात्र, आता ही समस्या गोव्याच्या अंतर्गत भागात पसरली असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय महसूल गुप्‍तचर यंत्रणेकडून पिसुर्ले येथील एका भाजप नेत्याच्या फॅक्टरीवर छापा मारुन 100 किलो केटामाईन जप्‍त करण्यात आले होते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारकडून काहीच स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यावरून सरकारच्याच आशीर्वादाने हा अमली पदार्थ व्यवसाय गोव्यात सुरु असल्याचे स्पष्ट होते. हप्‍ता पोचत नाही तेव्हाच अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात. अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली जाते. मात्र, अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या मुख्य सूत्रधारावर कसलीच कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.