Fri, May 29, 2020 21:56होमपेज › Goa › सीएए समर्थनार्थ 3 जानेवारीला भाजपची पणजीत महारॅली

सीएए समर्थनार्थ 3 जानेवारीला भाजपची पणजीत महारॅली

Last Updated: Dec 25 2019 1:38AM
पणजी : प्रतिनिधी 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ शुक्रवार दि. 3 जानेवारी 2020 रोजी पणजीत भाजपची महारॅली आयोजित करण्याचा निर्णय आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या  शासकीय  निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत भाजप आमदारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा तसेच राष्ट्रीय नागरीक नोंदणीबाबत जागृती करण्यासाठी बैठकांचेही आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

राज्यात 24 डिसेंबर 2019 ते 1 जानेवारी 2020 पर्यंत नाताळ सण तसेच नववर्षानिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात असल्याने त्यानंतरच म्हणजे 3 जानेवारीला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पणजीत भाजपची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. सदर कायदा म्हणजे नक्की काय आहे हे जनतेपर्यंत पोचणे गरजेचे असून या महारॅलीच्या माध्यमातून हा संदेश पोचवण्यात येईल. राष्ट्रीय नागरीक नोंदणी अर्थात एनआरसी हा वेगळा विषय असून त्याचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याशी कुठलाच संबंध नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप आमदारांच्या बैठकीत पक्ष निवडणूक तसेच राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतही चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात यापूर्वीच श्वेतपत्रिका जारी केली आहे. याविषयी भाजप आमदारांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले होेते. या प्रशिक्षण शिबिरात मंत्री निलेश काब्राल हे सहभागी झाले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा गोमंतकीयांवर कुठलाच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे केवळ नागरिकत्व मिळणार असून कुणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीदेखील कसल्याच प्रकारची भीती बाळगू नये. या कायद्याविषयी जागृती करण्याऐवजी काही जण मात्र या कायद्याबाबत कसलीच माहिती नसताना जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा काय आहे हे सांगण्यासाठी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात जागृती करण्यासाठी बैठकांचे आयोजन करावे, असे त्यांना या बैठकीत सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.