Mon, May 25, 2020 03:53होमपेज › Goa › सीएए, एनआरसी देशात लागू करू नये

सीएए, एनआरसी देशात लागू करू नये

Last Updated: Feb 10 2020 1:34AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची (सीएए) रचनाच धार्मिक भेदावर झाली असून ती देशाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे सीएए, एनआरसी आणि एनपीआरची देशात अंमलबजावणी केली जाऊ नये, अशी मागणी गोवा, दमण व दीवचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी केली आहे. 

डायोसेशन सेंटर फॉर सोशल कम्युनिकेशन, मीडियातर्फे आर्चबिशप फेर्रांव यांच्या नावाने शनिवारी निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सीएए अंतर्गत एखाद्याला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासाठी धर्माचा आधार घेतला जातो, ही गोष्टच देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, याविषयी आम्हाला खूप अभिमान आहे. सध्या देशात तसेच परदेशातही सगळीकडे सीएए, एनआरसीविरूद्ध लोक रस्त्यावर येत आहेत. लक्षावधी भारतीयांचा, आर्चबिशप आणि गोव्यातील कॅथलिक समाजाचा आवाज ऐका. भारतातील कॅथलिक समाज हा नेहमीच शांतताप्रिय असून भारतीय घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता या सूत्रांना मानणारा आहे. त्यांच्याकडून केली जाणारी मागणी ऐका. निषेधाचा सूर दुर्लक्षू नका. एनआरसी आणि एनपीआरद्वारे दलित, आदिवासी, स्थलांतरीत कामगार, भटकी जमात व कागदपत्रे नसलेल्या लोकांसारख्या दुर्लक्षित वर्गाचे शोषण होण्याची भीती आहे. यासाठी कोणतीही अट लागू न करता तात्काळ सीएएचा निर्णय मागे घ्या, अशी मागणी आर्चबिशप फेर्रांव यांनी केली आहे.

विधानसभा अधिवेशनात भाजप सरकारातील अल्पसंख्याक आमदार अतानसिओ मोन्सेरात आणि क्‍लाफासिओ डायस यांनी सीएएला पाठिंबा देणार्‍या ठरावाला मंजुरी दिली होती. कॅथलिक समाजाच्या मंत्री-आमदारांनी सीएएला पाठिंबा दिला असून आता आर्चबिशप फेर्रांव यांच्या या निवेदनानंतर त्यांची काय भूमिका असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आर्चबिशपांचा विरोध अनाकलनीय : सावईकर आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरला केलेल्या विरोधाबद्दल प्रदेश भाजपचे सरचिटणीस तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. सावईकर म्हणाले की, कोट्यवधी लोकांनी व गोमंतकीयांनीही सीएएला पाठिंबा दिलेला असताना आर्चबिशप विरोध का करत आहेत हेच मुळी समजत नाही.