Mon, May 25, 2020 14:11होमपेज › Goa › मांद्रेतून बाबी बागकर यांना काँग्रेसची उमेदवारी

मांद्रेतून बाबी बागकर यांना काँग्रेसची उमेदवारी

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:32AM
पणजी : प्रतिनिधी

मांद्रे मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसकडून मांद्रेची उमेदवारी बाबी बागकर यांना जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश काँग्रेसच्या दिल्‍ली मुख्यालयातून  निवडणूक समितीचे सरचिटणीस  मुकुल वासनीक  यांनी  मंगळवारी  दुपारी जारी केला.  

मांद्रेची उमेदवारी  बागकर यांना जाहीर झाल्याच्या आदेशाची प्रत  व्हॉट्स अ‍ॅपवर  व्हायरल झाल्यानंतरदेखील या वृत्ताला  प्रदेश काँग्रेसकडून दुजोरा दिला जात नव्हता. दिल्‍लीतून आम्हाला अधिकृतपणे उमेदवाराचे नाव कळवण्यात आले नसल्याचे  यावेळी सांगण्यात येत होते.

परंतु दुसर्‍या बाजूने काँग्रेस भवनमध्ये उपस्थित बाबी बागकर यांच्या चेहर्‍यावर  मांद्रेची उमेदवारी प्राप्‍त झाल्याचा आनंद झळकत होता, तेथे हजर असलेल्या पत्रकारांकडून ते शुभेच्छादेखील स्वीकारत होते.  अखेर संध्याकाळी  या वृत्ताला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते सुनील कवठणकर यांनी  दुजोरा दिला.

काँग्रेसकडून म्हापसा  पोटनिवडणुकीसाठी सुधीर कांदोळकर व शिरोडा पोटनिवडणुकीसाठी  महादेव नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  मात्र  मांद्रेचा तिढा कायम होता. मांद्रेतील उमेदवारीसाठी माजी केंद्रीय कायदा मंत्री तथा प्रवक्‍ते अ‍ॅड. रमाकांत  खलप, सचिन परब व बाबी बागकर हे शर्यतीत होते. या तिन्ही इच्छुक उमेदवारांकडून  तिकीटासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. परिणामी   कार्यकर्त्यांमध्ये हाणामारींपर्यंत विषय गेला होता. मात्र अखेर   उमेदवारीची माळ  बाबी बागकर यांच्या गळ्यात पडली आहे.