Sun, May 31, 2020 14:31होमपेज › Goa › 'एक्झिट पोलवर बंदी घाला'

'एक्झिट पोलवर बंदी घाला'

Published On: May 22 2019 1:36AM | Last Updated: May 22 2019 1:36AM
पणजी : प्रतिनिधी

निवडणूक एक्झिट पोल म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा एक्झिट पोलवर बंदी घालण्याबाबत विचार करावा अशी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. एक्झिट पोलमध्ये एक सांगितले जाते व प्रत्यक्ष निकाल हा भलताच असतो. यावरुन हे एक्झिट पोल मॅनेज केलेले असतात असा आरोपही त्यांनी केला.

कवळेकर म्हणाले, लोकसभा निवडणूक मतदानाचा अंतिम टप्पा नुकताच पार पडला. या टप्प्यानंतर एक्झिट पोल देण्यात आला असून यात भाजप आघाडीला 300 हून अधिक जागा प्राप्‍त होतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार हे स्पष्ट असूनही एक्झिट पोल मध्ये मात्र काँग्रेसला शून्य जागा दाखवण्यात आल्या आहेत. यावरून हे एक्झीट पोल सत्ताधारी मॅनेज करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्रातील भाजप सरकारला 70 टक्के आश्‍वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे. मात्र असे असूनही एक्झीट पोल वेगळंच काही तरी सांगत आहे. एक्झिट पोलव्दारे भाजप युती सरकारातील घटक पक्षावर दबाव आणून त्यांनी अन्यत्र जाऊ नये, हा यामागचा हेतू असल्याची टीकाही त्यांनी केली.

मतमोजणी दिवशी ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सतर्क रहावे. निवडणूक आचारसंहितेत विकास कामे करण्यास बंदी आहे. मात्र एक्झीट पोलवर नाही. एक्झिट पोल आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरत नाही, का असा प्रश्‍न कवळेकर यांनी उपस्थित केला.

लोकशाहीत मतदान प्रक्रियेला महत्व आहे. त्यामुळे अशा प्रकारे एक्झीट पोल घेणे म्हणजे लोकभावनेचा अपमान आहे. निवडणूक आयोगाने अशा एक्झिट पोलवर बंदी घालण्याबाबत विचार करावा. एक्झिट पोल केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

पणजी पोटनिवणुकीत जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देणार. पणजी पोटनिवडणूक काळात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. मात्र, असे असूनही मतदार मोठया संख्येने मतदानासाठी बाहेर आले असे त्यांनी सांगितले.

पीडित युवतीबाबत काँग्रेसचा संशय खरा ः कवळेकर

बाबूश मोन्सेरात बलात्कार प्रकरणातील पीडित युवती पणजी पोटनिवडणुकी नंतर आढळून आल्याने काँग्रेसचा संशय खरा ठरला असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सांगितले. पीडित युवती निवडणूक आचारसंहिता काळात बेपत्ता होऊन निवडणुकीनंतर सापडल्याने या प्रकरणाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी. यासंदर्भात काँग्रेस आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.