Wed, May 27, 2020 12:26होमपेज › Goa › भाजपचे स्टार प्रचारक आजपासून गोव्यात

भाजपचे स्टार प्रचारक आजपासून गोव्यात

Published On: Apr 13 2019 1:54AM | Last Updated: Apr 13 2019 1:53AM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी  आजपासून (दि.13) गोव्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्ष विजया रहाटकर, अभिनेत्री इशा कोप्पीकर तसेच अन्य स्टार प्रचारक भाजपच्या प्रचारात उतरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी एक वाजता गोव्यात दाखल होत आहेत. दुपारी चार वाजता साखळी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मडगाव येथे लोहिया मैदानावर ते जाहीर सभेत बोलणार आहेत. वास्को येथे बाजारपेठेत रात्री आठ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. फडणवीस दिवसभराच्या या सभा आटोपून रात्री दहा वाजता मुंबईतला परतणार आहेत.

हिंदी चित्रपट ‘कंपनी’फेम अभिनेत्री इशा कोप्पीकर उद्या रविवारी (दि.14)  दुपारी 4  वाजता चिंबल येथे सभा घेतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता झुवारीनगर येथे तर सायंकाळी 7 वाजता बायणा येथे त्या जाहीर सभा घेतील. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर रविवारी सांगे येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा घेतील. तर उद्या    दुपारी 3 वाजता केपे येथे जाहीर सभेत त्या संबोधन करणार आहेत.         

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू मंगळवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता पेडणे येथील जाहीर सभेला संबोधतील, तर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता पर्वरी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी बुधवारी (दि.17) सायंकाळी 5 वाजता मांद्रे येथील जाहीर सभेत व त्यानंतर सायंकाळी 6 वाजता डिचोली मतदारसंघात जाहीर सभा घेतील. सायंकाळी 7.30 वाजता म्हापसा येथे जाहीर सभेला गडकरी संबोधतील.

सिद्धू काँगे्रसचे एकमेव स्टार प्रचारक  

काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून माजी क्रिकेटपटू तथा खासदार नवज्योतसिंग सिद्धू राज्यात येणार असून ते म्हापसा आणि अन्य दोन-तीन ठिकाणी सभा घेणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.