Wed, May 27, 2020 16:51होमपेज › Goa › भाजपचे केंद्रीय नेतृत्वच गोव्यातील स्थितीला जबाबदार : चोडणकर

भाजपचे केंद्रीय नेतृत्वच गोव्यातील स्थितीला जबाबदार : चोडणकर

Published On: Oct 14 2018 1:37AM | Last Updated: Oct 14 2018 1:37AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात प्रशासन पूर्णपणे कोसळले आहे. दिशाहीन कारभारामुळे  जनता त्रस्त बनली आहे. गोव्यातील सध्याच्या स्थितीला पूर्णपणे भाजपचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व केंद्रीय काँग्रेस नेता पवन खेरा यांनी दिल्‍ली येथील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

गोव्याच्या जनतेला पूर्णवेळ मुख्यमंत्री हवा असून काँग्रेसला  बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी. यासाठी राज्यपालांनी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

चोडणकर म्हणाले की, भाजपला  गोव्यात एकही दिवस सत्तेवर राहण्याचा  घटनेनुसार अधिकार नाही.  राज्यातील प्रशासन एका बाजूने कोलमडत असतानाच दुसरीकडे मात्र गोवा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचार घेत असलेल्या दिल्‍ली येथील एम्स इस्पितळात पार पडली. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. गोव्यातील प्रशासन  कोडमडले असून कारभार दिशाहीन बनला आहे.  कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे जनतेमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. 

खाण व्यवसाय, प्रादेशिक आराखडा, बेरोजगारी, फार्मेलिन आदी विविध महत्वाचे विषय कुठल्याही तोडग्याशिवाय प्रलंबित असल्याची टीकाही त्यांनी केली. 

गोव्यातील विद्यमान स्थितीला   भाजपचे केंद्रीय नेतृत्वच जबाबदार आहे. गोव्यात भाजपकडे बहुमत नसतानादेखील भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र 23 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री बदलण्यास स्पष्ट नकार दिला. जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. जनतेने    विधानसभा निवडणुकीत दिलेला कौल नाकारुन भाजप युती सरकारने सत्ता स्थापन केली होती. जनतेला आता  पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

खेरा म्हणाले,  गोव्यात काँग्रेसकडे  बहुमत आहेत. जनतेचा कौल नाकारुन भाजपने सरकार स्थापन केले. त्यामुळे आता राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी जनतेचा आवाज ऐकून काँग्रेसला बहुमत सिध्द करण्याची संधी द्यावी. यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. यामुळे स्पष्ट होईल की बहुमत कुणाकडे आहे.

पूर्ण वेळ मुख्यमंत्री आवश्यक

भाजपकडून गोव्यात  काळजीवाहू मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याचीदेखील  नियुक्‍ती केलेली नाही.  लोकशाहीनुसार सुरळीत  प्रशासनासाठी पूर्णवेळ मुख्यमंत्री आवश्यक आहे. यासाठी बहुमत सिध्द करणे अनिवार्य असल्याचेही पवन खेरा यांनी सांगितले.

पर्रीकरांकडे राफेलबाबत गोपनीय माहिती

काँग्रेसने माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही राफेलप्रकरणात ओढले आहे. परीर्र्कर यांच्या काळात केंद्र सरकारने फ्रान्ससोबत वादग्रस्त राफेल करार केल्याचा आरोप काँगे्रसने केला आहे. राफेलप्रकरणी  पर्दाफाश होण्याची शक्यता असल्यानेच केंद्र सरकार पर्रीकरांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला करीत नसल्याची टीकाही गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.