Wed, May 27, 2020 17:21होमपेज › Goa › भाजप मंत्री, खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना भेटणार  

भाजप मंत्री, खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना भेटणार  

Published On: Oct 30 2018 1:30AM | Last Updated: Oct 30 2018 1:30AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू  व्हावा, यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या समितीची भाजपचे सर्व मंत्री, खासदार यांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी, असा ठराव सोमवारी झालेल्या भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी दिली. 

येथील भाजप मुख्यालयात विधिमंडळ गटाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला बहुतांश भाजप आमदारांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 8 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राज्यातील खाणी सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनात खाणबंदीमुळे सुमारे 2 लाख   अवलंबितांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या भेटीनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी यांना भेटून खाणींबाबत हस्तक्षेप करण्याचे सोमवारच्या बैठकीत ठरवण्यात आले.  

तेंडूलकर म्हणाले, की  पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा  तसेच केंद्रीय मंत्री गटाला  भाजपाचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाणार आहे. या भेटीसाठी भाजपचे चार मंत्री, तिन्ही खासदार तसेच सभापती व उपसभापती जाणार आहेत. यासाठी सर्वांच्या भेटीसाठी वेळ मागितली जाणार आहे. राज्यातील खाणी लवकरच सुरू होतील, असा आम्हाला  विश्‍वास आहे. 

खाणी सुरू होत नसल्याने राज्यातील जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे. खाणबंदीमुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील लोकांवर परिणाम झाला आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची तातडीने गरज आहे. यासाठी पंतप्रधान मोदी, शहा  तसेच केंद्रीय मंत्री गटातील सदस्यांशी बोलून भेटीची वेळ ठरवण्याची जबाबदारी तेंडूलकर यांच्याकडे देण्यात आली आहे. खाणबंदी उठवण्याबाबत मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात  विषय काढण्याची विनंती राज्य भाजप प्रदेश मंडळातर्फे  केली जाणार असल्याचे उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले. 

भाजपाचे सर्व मंत्री दर पंधरा दिवसांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच सामान्य माणसांनाही मुख्य कार्यालयात भेटणार आहेत. राज्य सरकारच्या विविध खात्यातील सुमारे 3 हजार जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे  लोबो यांनी नमूद केले.