Wed, May 27, 2020 06:10होमपेज › Goa › भाजप नेत्यांची दिल्लीत वटच नाही : सुदिन ढवळीकर

भाजप नेत्यांची दिल्लीत वटच नाही : सुदिन ढवळीकर

Last Updated: Feb 29 2020 1:50AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा
म्हादईसंबंधी कर्नाटकातील खासदार, मंत्री दिल्लीला जाऊन केंद्रीय जलस्रोत मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना भेटल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी केली जाते. गोव्याचे मुख्यमंत्री, तिन्ही खासदार व अन्य आमदार अनेकदा दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटून काहीही परिणाम होत नाही. याचा अर्थ; राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री, केंद्रीय आयुषमंत्री, खासदारांची आणि राज्यातील भाजपची केंद्रात वट नसल्याचे सिद्ध होत असून भाजपचे हे मोठे अपयश असल्याची टीका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथील पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ढवळीकर म्हणाले की, कर्नाटकातील सहा मंत्री, केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी दिल्लीला जाऊन केंद्रीय जलस्रोतमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना भेटल्याच्या 24 तासांच्या आत केंद्र सरकार अधिसूचना काढते, याचा अर्थ कर्नाटकाला केंद्र सरकार अधिक मान देत असल्याचे सिद्ध होत आहे. याउलट, राज्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व मंत्रिमंडळातील अन्य मंत्री दिल्लीला जाऊनही काहीही फायदा होत नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी भाजपकडून म्हादईसंबंधी उचित न्याय मिळणार नाही, असे जाहीर करावे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकाला लिहिलेल्या पत्रात या घडामोडीची कल्पना दिली होती. केंद्र आणि कर्नाटक सरकार यांची हातमिळवणी झाली असल्याचे त्यातून समजून येते.

म्हादईबाबतील 1970 सालापासून आजपर्यंत जो काही घटनाक्रम झाला तो सर्व गोमंतकीयांना सविस्तर समजण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, या मागणीचा आपण पुनरुच्चार करत आहे. म्हादई नदीवर किती प्रकल्प, बंधारे उभे केले गेले, किती खटले दाखल करण्यात आले, न्यायालयाचा निकाल काय लागला, कोणी पत्रे लिहून दिली या गोष्टीची माहिती समजणे गरजेचे आहे. कर्नाटकाकडून होत असलेल्या कारवाया पाहता येत्या 20 वर्षांत गोव्यात म्हादईचे पाणी पोचणार नसून राज्यातील नदी-नाले, विहिरी आटण्याची भीती आहे. म्हादईबाबत श्वेतपत्रिका काढण्यास मुख्यमंत्री सावंत यांनी नकार दिला असून म्हादईबाबतीत राज्य सरकारच्या धोरणावर आमचा विश्वास राहिलेला नाही. म्हादई नदीचे पाणी अडविल्याचा परिणाम भविष्यात राज्यावर आणि आगामी पिढीवरही होणार असून त्यावेळी राज्य सरकारलाच दोष दिला जाणार आहे. शेवटी लोकांना म्हादई वाचवण्यासाठी रस्त्यावर येणे भाग पडणार असल्याचा इशारा ढवळीकर यांनी दिला. 

या पत्रकार परिषदेत डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ आणि मये मतदारसंघातील मगोचे माजी उमेदवार मिलिंद पिळगावकर उपस्थित होते.