Mon, May 25, 2020 13:19होमपेज › Goa › काँग्रेसवरील खाण घोटाळ्याचा भाजपचा आरोप खोटा

काँग्रेसवरील खाण घोटाळ्याचा भाजपचा आरोप खोटा

Published On: Feb 28 2019 1:13AM | Last Updated: Feb 28 2019 1:13AM
पणजी : प्रतिनिधी

भाजपने केवळ मतांच्या फायद्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने 35 हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा केल्याचा खोटा आरोप केला. मात्र, हा आरोप सिद्ध करण्यात त्यांना अपयश आल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची व काँग्रेस पक्षाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली.

या खाण घोटाळा झाल्याच्या कथीत आरोपामुळे खाण व्यवसाय बंद पडला. याचा फटका राज्याच्या महसूलाला बसला आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे, असेही चोडणकर म्हणाले.

चोडणकर म्हणाले, की तत्कालीन विरोधी पक्षनेते  पर्रीकर यांनी  2011 साली 35 हजार कोटी रुपयांचा  खाण घोटाळा झाल्याचा आरोप केला. या घोटाळ्याप्रकरणी लोक लेखा समितीचा अहवाल तयार करण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात हा अहवाल विधानसभेत कधी मांडण्यात आलाच नाही, कारण हा अहवाल कधी अस्तित्वातच नव्हता. 

सदर आरोप हे केवळ मतांच्या फायद्यासाठी करण्यात आले होते. प्रत्यक्षात सरकारमध्ये येऊन देखील हे आरोप त्यांना सिध्द करता आले नाहीत. त्याचबरोबर या घोटाळ्याच्या रकमेची वसुलीही करता आली नाही. 2016 साली एका युवकाने खाण घोटाळ्याच्या आरोपसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार  केला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी खाण  खात्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले असता या घोटाळ्यासंदर्भात कुठलाच उल्‍लेख खाण खात्याकडून करण्यात आला नाही, असेे त्यांनी सांगितले.

या घोटाळ्याच्या आरोपामुळे जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच  काँग्रेसची बदनामी करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जनतेची व काँगेसची  माफी मागावी, अशी मागणी  चोडणकर यांनी केली.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, खाण घोटाळ्याचे खोटे चित्र भाजपने तयार केले होते. 2011 मध्ये या घोटाळ्यासंबंधी तत्कालीन राष्ट्रपतींची भेट भाजप शिष्टमंडळाने तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली घेतली होती. या तक्रारीत तेव्हाच्या सर्व काँग्रेस आमदारांचा उल्‍लेख करण्यात आला होता. मात्र, आता त्यापैकी विश्‍वजित राणे तसेच सुभाष शिरोडकर  यांना भाजपमध्ये सामिल करुन घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे गोवा  प्रभारी ए. चेल्‍लाकुमार, आमदार दिगंबर कामत, फिलीप नेरी रॉड्रिग्स, नीळकंठ  हळर्णकर, क्‍लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते.

निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर ः चेल्लाकुमार

केंद्र सरकारकडून  आगामी लोकसभा निवडणुकीत  पुन्हा सत्ता प्राप्‍त करण्यासाठी  सुरक्षा यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप   काँग्रेसचे गोवा प्रभारी ए. चेल्‍लाकुमार यांनी  पुलवामा येथे झालेल्या जवानांवरील  हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर केला.  सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर  केंद्राकडून  केला जात असल्याचे जनतेला देखील वाटत आहे. गोध्रा  प्रकरण  हा  भाजपचा   पूर्वनियोजित कट होता, असा व्हिडिओ देखील  व्हायरल झाला आहे.  ते खरे असेल तर पुलवामा घटनेबाबतही  ते खरे नसेल कशावरून? या हल्ल्यातील जवानांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे मग दहशतवाद्याचा मृतदेह कुठे आहे? असा प्रश्‍नही त्यांनी  उपस्थित केला.

खाण घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्रास

खाण घोटाळ्याच्या आरोपांमुळे आपल्याला सर्वांत जास्त त्रास सहन करावा लागला. लोक लेखा समितीचा अहवाल विधानसभेत कधी मांडण्यात आलाच नाही. त्यामुळे या अहवालाचे कुठलेही कायदेशीर अस्तित्व  नाही. शहा आयोगाने देखील आपल्या अहवालात या घोटाळ्यातील आंकड्याची फेरतपासणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते,  असे माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.