Mon, May 25, 2020 09:03होमपेज › Goa › तिसवाडीतील आघाडी टिकविण्याचे भाजप पुढे आव्हान

तिसवाडीतील आघाडी टिकविण्याचे भाजप पुढे आव्हान

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 12:55AM
पणजी : प्रतिनिधी

तिसवाडी तालुका हा निवडणुकीत भाजपला नेहमी आधार राहिला आहे. या तालुक्यात येणार्‍या पाच मतदारसंघापैकी ताळगाव, सांतआंद्रे आणि सांताक्रुज तीन मतदारसंघात सध्या काँग्रेसचे आमदार आहे. पणजी आणि कुंभारजुवे हे भाजपच्या आमदारांकडे असल्याने लोकसभेत याच दोन मतदारसंघाकडून आशा आहे. मात्र,पणजीचे  आमदार तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच सांत आंद्रेचे माजी आमदार विष्णू वाघ यांच्या निधनामुळे आणि कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या दिर्घकाळच्या आजारपणामुळे लोकसभा निवडणुकीत या विभागात आपला पाठिंबा टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजप समोर आहे.

लोकसभेच्या   2014 सालच्या निवडणुकीत  भाजपचे श्रीपाद नाईक  यांना तिसवाडी तालुक्यात त्यावेळी एकूण 45 हजार144 व  काँग्रेसच्या रवी नाईक यांना 35 हजार 599 मते प्राप्त झाली होती. नाईक यांना तिसवाडी तालुक्याने मागील लोकसभा निवडणुकीत  9545  मतांची आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी भाजप भरून काढणार काय असा प्रश्‍न आहे.

ताळगाव, सांताक्रुज व सांत आंद्रेमध्ये काँग्रेसचे आमदार असल्याने त्याचा प्रभाव यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. सांत आंद्रेत माजी आमदार स्व. विष्णू वाघ यांच्या जोरकस प्रयत्नामुळे गत लोकसभा निवडणुकीत भाजपला 1367 मतांची आघाडी मिळाली होती. यंदा सांत आंद्रे पुन्हा फ्रान्सिस सिल्वेरा यांच्याकडे गेले असल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. 

तिसवाडीतील पणजी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या सुशिक्षीत मतदारांवर कायम पगडा राहिला होता, तो माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा. पर्रीकर यांनी 1994 सालापासून पणजीचे प्रतिनिधीत्व केले आहे. अपवाद फक्त संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले तो काळ,  पर्रीकर यांचाच नावे हा मतदारसंघ लिहिला गेला आहे. त्यांचा या मतदारांवर एवढा पगडा होता की त्यांनी आपल्या अनुपस्थितीत वारस म्हणून सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना दिलेला मान मतदारांनी सहज स्वीकारला होता. मात्र, यंदा पर्रीकर यांचा भक्कम आधार आणि दमदार वाणी  नसल्याने श्रीपाद नाईक यांना पणजीत आपले समर्थन कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावा लागत आहे. पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मे मध्ये होणार आहे. भाजपतर्फे  पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यसांना उमेदवारी देण्याविषयी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रीपाद नाईक यांच्या प्रचारात सहभागी होण्यास सांगितले आहे. मनोहर पर्रीकर यांच्या मागे त्यांच्या पुत्राचा वावर भाजपच्या मताची अनुकूलता कायम राखेल. अशी चर्चा असताना आता बाबूश मोन्सेरांत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असल्याने आणि पणजीतही त्यांचा प्रभाव असल्याने पणजीचा कल कसा राहिल याविषयी अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. 

पणजी मतदारसंघातील सुमारे 32 हजार मतांपैकी बहुतांश हिंदू समाजातील असून, 6 हजार कॅथलिक आणि सुमारे दिड-दोन हजार मुस्लीम धर्मीयांची आहेत. अल्पसंख्याकांची मते बर्‍याच प्रमाणात काँग्रेसला मिळत आली आहेत.

लोकसभेच्या 2014 सालच्या  निवडणुकीत पणजीत भाजपला 9 हजार 785 मते प्राप्त झाली होती, तर काँग्रेसच्या रवी नाईक यांना फक्त 4529 मते मिळाली होती.  नाईक यांना पर्रीकर आणि विष्णू वाघांच्या गैरहजेरीत तिसवाडीचा गड राखणे मोठे आव्हान आहे. पणजी मतदारसंघ  राखणे हे  भाजपला प्रतिष्ठेचे असून लोकसभा निवडणुकीत आणि पाठोपाठच्या पोटनिवडणुकीत पणजीवासीयांचा उत्साह कायम ठेवून भाजपच्या मतदारांना बाहेर काढणे हे स्थानिक नेत्यांसाठी कसोटीचे ठरणार आहे. 

मागच्या लोकसभा निवडणुकीत ताळगावात भाजप - काँग्रेसमध्ये  अटीतटीची लढत होऊन काँग्रेसला 8591 आणि भाजपला 9469 मते प्राप्त झाली होती. सांताक्रुजमध्येही अशीच काँग्रेसला 8775 आणि भाजपला 9124 मते मिळाली होती.ताळगाव आणि सांताक्रुज या दोन्ही मतदारसंघाने मिळून श्रीपाद नाईक यांना मागील लोकसभेत 1227 मतांची आघाडी मिळवून दिली होती. 

ताळगाव, सांतआंद्रे आणि सांताक्रुजमध्ये सध्या काँग्रेसचे आमदार आहेत.  काँग्रेसचे आमदार अनुक्रमे जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा आणि टोनी फर्नांडिस चोडणकर यांच्यासाठी किती काम करतात हेही महत्वाचे आहे. 

कुंभारजुवेतही गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला अनुक्रमे 7373 आणि 9068 मते मिळाली होती. कुंभारजुवेचे आमदार पांडुंरग मडकईकर हे सध्या सक्रीय नसले तरी त्याचा  काँग्रेस किती फ ायदा घेऊ शकेल याबाबत शंका आहे.