Tue, May 26, 2020 05:04होमपेज › Goa › भाजपचे राजेश पाटणेकर नवे सभापती

गोवा विधानसभा सभापतीपदी राजेश पाटणेकर 

Published On: Jun 04 2019 1:29PM | Last Updated: Jun 05 2019 1:28AM
पर्वरी : प्रतिनिधी

गोवा विधानसभेच्या सभापतिपदी भाजपचे डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांची मंगळवारी झालेल्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात निवड झाली. सभापतिपदासाठी झालेल्या मतदानावेळी पाटणेकर हे काँग्रेसचे सभापतिपदाचे उमेदवार प्रतापसिंह राणे यांच्याविरोधात 22 विरुद्ध 16 मतांनी विजयी ठरले. मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी राणे यांना मतदान केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे सभागृहात अनुपस्थित राहिले.

सभापतीच्या निवडणुकीत भाजपतर्फे आमदार राजेश पाटणेकर व काँग्रेसतर्फे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता हंगामी सभापती लोबो यांनी मतदान घेतले. 

मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सभागृहाच्या सदस्यांनी उभे राहून मतदान केले, तर तब्येतीच्या कारणास्तव कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना केवळ हात उंचावून मतदानात भाग घेण्याची मुभा देण्यात आली. यावेळी पाटणेकर यांच्या बाजूने 22 मते तर राणे यांच्या बाजूने 16 मते पडली. आमदार प्रतापसिंह राणे यांची ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिली हार ठरली आहे.

निवड झाल्यानंतर नवनियुक्‍त सभापती पाटणेकर म्हणाले, सभापतिपदावर निवड केल्याबद्दल सर्व आमदारांचे आपण आभार मानतो. भविष्यातदेखील सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. सभापतिपदी संधी मिळल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सभापतिपद हे सभागृहातील सर्वात उच्च पद आहे. आपण नि:पक्षपातीपणे काम करणार आहे. सभागृहासमोर तीन आमदारांविरोधात अपात्रता याचिका प्रलंबित असून या याचिका लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सभापती पाटणेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पाटणेकर हे युवा चळवळीतून आलेले नेते आहेत. डिचोली तालुक्यातील सभापती बनलेले आताच्या काळातील हे तिसरे आमदार आहेत. 

यापूर्वी अनंत शेट , आपण स्वत: व आता पाटणेकर सभापती बनल्याने ही अभिमानाची गोष्ट आहे. 

काँग्रेस आमदार तथा सभापतीपदाचे उमेदवार प्रतापसिंह राणे यांनी यावेळी पाटणेकर यांना सभापतीपदाला न्याय द्यावा तसेच योग्य ते निर्णय घ्यावेत, असे आवाहन केले.
नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी सरकारचे आभार व्यक्त करून डिचोलीच्या विकासाला चालना मिळणार, असे सांगितले. सर्व पंचायत सरपंच, पंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते नगरसेवक यांनी मोठ्या संख्येने विधानसभेत उपस्थित राहून पाटणेकर यांचे अभिनंदन केले. अनेक कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. मतदारसंघात मिठाई वाटून व आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.