Mon, May 25, 2020 10:24होमपेज › Goa › कोरोनाविषयी जागरुकता मोहीम राबविणार

कोरोनाविषयी जागरुकता मोहीम राबविणार

Last Updated: Feb 05 2020 2:30AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात नोवेल कोरोना विषाणूविषयी जागरुकता करण्यासाठी सरकार अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना जागरुकता मोहिमेत सहभागी करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सामान्यांपर्यंत हा विषय पोचावा यासाठी अंगणवाडी स्तरावरून जागरूकता मोहीम सुरू करणार, अशी ग्वाही आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी, मंगळवारी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार जयेश साळगांवकर, विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विनोद पालयेकर व सुदिन ढवळीकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री राणे बोलत होते. 

राणे पुढे म्हणाले,की  राज्यभरात कोरोना विषाणूसंदर्भात ़जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना व्हायरसबद्दल प्रशिक्षण आणि जागरूकता करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि शिक्षकांना विश्वासात घेतले जाईल.जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वांचे राज्य सरकार पालन करीत आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालनालयाच्या आपण संपर्कात आहे. शिक्षण संचालकांना पत्र लिहिणार असून   सर्व लोकांना या आजाराबद्दल जागरूक केले जाणार आहे. आम्ही परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष देऊन आहोत. यासंदर्भात अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात याच्याशी आपण सहमत आहे. परंतु आमच्यासाठीही व्हायरस नवीनच आहे व प्रयत्न सुरूच आहेत. गोवा विमानतळावर थर्मल स्कॅनरची मागणी करण्यासाठी आपण  दिल्लीला गेले होतो, असेही त्यांनी सांगितले. 

सर्वांनी या विषयावर एकत्र येण्याची गरज आहे. बस किंवा रेल्वेने येणार्‍या लोकांना कसे हाताळायचे, त्यासाठी योग्य उपाययोजना आखण्यात येतील. कोरोना व्हायरस म्हणजे काय याची लोकांना माहिती नाही आणि म्हणूनच  ही माहिती अंगणवाडी आणि इतर यंत्रणेद्वारे लोकांपर्यंत पोचविण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.आमदार विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी राज्यात विषाणूचा फैलाव  होऊ नये, यासाठी राज्य सरकारने अतिरक्त खबरदारी घ्यावी, अशी विनंती केली. केरळमधील लोक रेल्वे आणि बसेसद्वारे गोव्यात दाखल होत असल्याने  विरोधी सदस्यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली.  

खंवटे म्हणाले, की  कोरोना व्हायरस हा  गंभीर विषय आहे. केरळ व इतर भागातून येणार्‍या नागरिकांची योग्य पद्धतीने तपासणी आवश्यक आहे. राज्यात दाखल होणार्‍या  प्रत्येकाची तपासणी व्हायला हवी.सरदेसाई म्हणाले, की या क्षणी चीनमधून येणार्‍या पर्यटकांना थांबवणे आवश्यक आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर चीनमधून पर्यटक आणण्यासाठी गेले होते. मात्र चीनमधून पर्यटक गोव्यात येत नाहीत, ते एका अर्थाने चांगलेच ठरले, असेही सरदेसाई यांनी सांगितले.