Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Goa › शिक्षण संस्था कर्मचार्‍यांना निवडणूक ड्युटीची सुटी देण्यास टाळाटाळ

शिक्षण संस्था कर्मचार्‍यांना निवडणूक ड्युटीची सुटी देण्यास टाळाटाळ

Published On: Apr 27 2019 1:58AM | Last Updated: Apr 28 2019 1:06AM
पणजी : प्रतिनिधी

निवडणूक ड्युटी संपल्यानंतर देखील शैक्षणिक संस्थेच्या कर्मचार्‍यांना सुटी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदर प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्‍लंघन ठरत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी केला. याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले असून त्यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पाडगावकर म्हणाले, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या ड्युटीसाठी शाळा, कॉलेज तसेच शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने नियुक्‍त करण्यात आले होते. प्रत्यक्षात निवडणूक ड्युटी संपल्यानंतर त्यांना दुसर्‍या दिवशी सुट्टी देणे आवश्यक होते. निवडणूक आयोगाचा नियम देखील तेच सांगतो. मात्र, असे असूनही या कर्मचार्‍यांनी निवडणूक ड्युटी संपल्यानंतर सुटीऐवजी त्यांना संबंधीत संस्था, तसेच कॉलेजने कामावर हजर राहण्यास सांगितले, असा आरोप पाडगावकर यांनी केला.

सदर प्रकार म्हणजे कर्मचार्‍यांवर अन्याय आहे. या कर्मचार्‍यांनी जवळपास 30 तास निवडणूक ड्युटी केली. त्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशी सुटी मिळणे गरजेचे होते. निवडणूक ड्युटी करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना दुसर्‍या दिवशी सुटी देण्यात आली. मग याच कर्मचार्‍यांना का अमान्य करण्यात आली असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ते निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्‍लंघन ठरते. शैक्षणिक संस्थेच्या कर्मचार्‍यांना सुटी अमान्य करण्यात आल्याने हा विषय मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यात आला असून त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पाडगावकर यांनी केला.