Wed, Jul 08, 2020 12:13होमपेज › Goa › लिलावास परवानगी देऊ नये : दिगंबर कामत

लिलावास परवानगी देऊ नये : दिगंबर कामत

Published On: Oct 04 2019 1:44AM | Last Updated: Oct 04 2019 12:34AM
पणजी : ‘एसईझेड’ प्रमोटर्सकडून मिळालेली जमीन तमाम गोमंतकीयांची असून, पुढच्या पिढीसाठी तिचे जतन करणे महत्त्वाचे आहे. ‘एसईझेड’च्या प्रमोटर्सकडून परत घेतलेल्या जमिनीचा लिलाव करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी परवानगी देऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.      

गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार ग्लेन टिकलो यांनी सदर जमिनीच्या लिलावासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळायची आहे, असे विधान केले होते. त्याला अनुसरून दिगंबर कामत यांनी ही मागणी पत्रकातून केली आहे. कामत म्हणाले की, गोमंतकीयांच्या भावनांचा आदर करुन आपण मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने गोव्यातील ‘एसईझेड’ रद्द केले होते. उच्च न्यायालयानेही आमचा निर्णय योग्य ठरवून सदर जागेचे वाटप बेकायदा होते असा निर्णय दिला होता. त्यामुळे सदर जागा परत देणे त्या प्रमोटर्सवर बंधनकारकच होते. 

सदर जमीन परत घेताना त्यांना व्याजापोटी रक्कम देणेही पूर्णपणे बेकायदेशीर असून, मागच्या विधानसभा अधिवेशनात आपण या विषयावर उद्योगमंत्री विश्वजित राणे यांच्यासमोर हा मुद्दा मांडला होता व त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमात व्याजाची रक्कम देण्याची तरतूद नसल्याचे मान्य केले होते. सरकार जर बेकायदेशीरपणे आयडीसी जमिनींचा लिलाव करुन त्यातून आलेली रक्कम व्याज व इतर देणी फेडण्यासाठी वापरणार असेल तर ते बेकायदा ठरणार असून, सरकार कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असल्याचे कामत यांनी म्हटले.