Wed, Jul 08, 2020 12:29होमपेज › Goa › कळंगुटमध्ये शेतजमीन बुजवण्याचा प्रयत्न; दोन ट्रक, एक जेसीबी जप्त

कळंगुटमध्ये शेतजमीन बुजवण्याचा प्रयत्न; दोन ट्रक, एक जेसीबी जप्त

Last Updated: Nov 11 2019 1:32AM
बार्देश : प्रतिनिधी

पोरबावाडा-कळंगुट येथील पाल्मारिन्हा हॉटेल परिसरात मातीचा भराव टाकून बेकायदेशीररित्या शेती बुजवणारे दोन खासगी ट्रक आणि एक जेसीबी मशीन कळंगुट पोलिसांनी रविवारी जप्त केले. या कारवाईवेळी ट्रक चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक पंचायत सदस्य रूपा चंद्रकांत चोडणकर यांच्या लेखी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्याचा गैरफायदा घेत अज्ञातांकडून कळंगुट पंचक्रोशीतील प्रभाग क्र.दोन मधील शेतजमिनीत भराव टाकण्याचा प्रकार सकाळपासून सुरू होता. तथापि, स्थानिकांना या प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी त्वरीत स्थानिक पंचायत सदस्य रुपा चोडणकर यांना घटनेची माहिती दिली. यावेळी चोडणकर यांनी त्वरीत घटनास्थळाला भेट दिली असता तिथे तीन ट्रक तसेच एक जेसीबी मशीन शेतजमिनीत मातीचा भराव टाकून ती बुजवत असल्याचे त्यांना दिसले. तातडीने चोडणकर यांनी कळंगुट पोलिसांना घटनास्थळी पाचारण केल्याने कळंगुटचे पोलिस उपनिरीक्षक वायंगणकर यांनी त्वरीत कारवाई करीत घटनास्थळावरून दोन ट्रक (क्र. जीए-03/के-9222 , जीए-03/के- 8496) तसेच एक जेसीबी मशीन (क्र. जीए-03/पी-1165) ताब्यात घेतले. 

दरम्यान, घटनास्थळावरून अन्य एक ट्रक ( क्र : जीए-03/के- 8600) चा चालक गोंधळाचा फायदा घेऊन तेथून पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व वाहनांवर, दोन ट्रक तसेच जेसीबी मशीनच्या पुढील काचेवर ‘सरकारी सेवेत’ असे फलक लावण्यात आले होते. पंचायत सदस्य रुपा चोडणकर यांनी यापुढे पंचक्रोशीतील शेतजमिनी बुजविण्याचे प्रकार कुठल्याही स्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. या कामात स्थानिक पोलिस तसेच स्थानिक रहिवाशांचे सहकार्य मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कळंगुटचे पोलिस उपनिरीक्षक याबाबतीत पुढील चौकशी करीत आहेत.