Thu, May 28, 2020 06:37होमपेज › Goa › 'कलम ३७० रद्दबाबत सोनियांनी मत व्यक्‍त करावे'

'कलम ३७० रद्दबाबत सोनियांनी मत व्यक्‍त करावे'

Published On: Aug 19 2019 1:32AM | Last Updated: Aug 19 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

केंद्र सरकारने घटनेतील कलम-370 हटविल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून अनेक काँग्रेस नेते वेगवेगळी मते प्रदर्शित करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रतिक्रीया द्यावी, असे मत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे व्यक्त केले.

भाजप कार्यकर्त्यांच्या संमेलनाला  उपस्थिती लावल्यानंतर भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौहान  बोलत होते. ते म्हणाले, की  भारतीय घटनेतील कलम-370 हटवण्याच्या केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयावर विरोधी काँग्रेस नेत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत असून अनेक काँग्रेस नेते वेगवेगळी मते प्रदर्शित करत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मौन साधले आहे. यासाठी सोनियांनी या विषयावर मौन सोडून आपले मत प्रदर्शित करावे, अशी आपण मागणी करत आहे. 

या विषयावर यावर राहुल गांधी यांनी बोलणे आपणाला संयुक्तीक वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवामुळे राहुल गांधी हे ‘रणछोड दास गांधी’ बनले असून त्यांनी पक्षाला वार्‍यावर सोडून दिले आहे. खरे तर त्यांनी पुन्हा पक्षबांधणीला जुंपून घेण्याची गरज आहे. असे सांगून जम्मू व काश्मीर बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा करताना चौहान यांनी त्यांना ‘भगवान कृष्ण व अर्जुन’ अशी उपमा दिली. ते म्हणाले, की माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या राजकारणामुळे गोवा  तसेच जम्मू व काश्मीरच्या जनतेला हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या होत्या. नेहरू यांच्या कचखाऊ धोरणामुळेच पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाले असल्याचे चौहान यांनी सांगितले. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 14 वर्षांपर्यंत  गोव्याच्या जनतेची पोर्तुर्गीजांच्या जुलमी राजवटीतून सुटका झाली नव्हती. मात्र, गोवा मुक्तीनंतर राज्याची जशी प्रगती आणि विकास झाला तसाच जम्मू व काश्मीरचाही विकास आता होणार आहे. 

या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर, सरचिटणीस सदानंद तानावडे आणि माजी खासदार नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते.