Mon, May 25, 2020 13:20होमपेज › Goa › गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी शहांसमोर दोन पर्याय!

गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी शहांसमोर दोन पर्याय!

Published On: Sep 21 2018 1:32AM | Last Updated: Sep 21 2018 1:32AMपणजी : प्रतिनिधी

उपचारासाठी इस्पितळात दाखल असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याजागी उपमुख्यमंत्री नेमून त्यांच्याकडे  प्रशासनाचा तात्पुरता ताबा देणे, अथवा पुन्हा त्रिमंत्री सल्लागार समिती (सीएसी) नेमणे यापैकी एक पर्याय स्वीकारण्याचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निश्‍चित केला आहे. याविषयी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी बोलणी करून शुक्रवारी (दि.21) अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आजारपणामुळे भाजप आघाडी सरकारात निर्माण झालेल्या पेचप्रसंगांवर अंतिम तोडगा काढण्यावर भाजप श्रेष्ठींचे एकमत झाले आहे.  दिल्लीत गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद तानावडे आणि भाजपचे केंद्रीय पक्ष निरीक्षकांसबोत शहा यांनी सतत दुसर्‍या दिवशी चर्चा केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गुरूवारी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्याशी फोनवर संपर्क  साधून श्रेष्ठींच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदी पर्रीकर हेच कायम राहणार असून फक्त प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी उपमुख्यमंत्री नेमण्यावर भाजप श्रेष्ठींचा अधिक भर आहे. तात्पुरता मुख्यमंत्री अथवा नवा मुख्यमंत्री नेमल्यास त्याला विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार असून ते विरोधी काँग्रेसने रचलेल्या सापळ्यात अडकण्यासारखे होणार असल्याचे भाजपच्या नेतृत्त्वाचे मत बनले आहे.  काँग्रेसने राज्यपाल डॉ. मृदूला सिन्हा यांच्याकडे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करून याबाबत  आघाडी घेतली आहे. 

याशिवाय, याआधी निर्माण करण्यात आलेली त्रिमंत्री सल्लागार समिती नेमण्याचा प्रयोग पुन्हा करण्याबाबतही घटक पक्षांकडे भाजपने बोलणी सुरू केली आहेत. त्यात मगोचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे दोन मंत्री कायम राहणार आहेत. मात्र आजारी असलेले  म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्याजागी भाजपमधल्या एका आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात सर्वात अनुभवी आणि तीनदा निवडून आलेले सभापती प्रमोद सावंत आणि राजेश पाटणेकर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. भाजपचे चार आमदार पहिल्यांदा तर बाकीचे केवळ दोनदाच निवडून आले आहेत.

पितृपक्षाआधी मुहूर्त 

येत्या रविवारपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू होत असून हिंदू शास्त्रानुसार या कालावधीत कोणतेही नवे काम अथवा कार्य हाती घेतले जात नाही. त्यामुळे रविवारच्या आधी राज्याच्या कारभाराबद्दल निर्णय घेऊन तो अंमलात आणण्याचे भाजप श्रेष्ठींनी ठरविले आहे.  शनिवारपर्यंत उपमुख्यमंत्रिपद जाहीर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.