Mon, May 25, 2020 02:41होमपेज › Goa › ‘नू शि’तील नाफ्ता काढण्यासाठी उद्यापर्यंत कंत्राटदाराची नेमणूक

‘नू शि’तील नाफ्ता काढण्यासाठी उद्यापर्यंत कंत्राटदाराची नेमणूक

Last Updated: Nov 09 2019 11:48PM
पणजी : प्रतिनिधी

‘नू शि नलिनी’ या जहाजातून नाफ्ता काढण्यासाठी सोमवार दि. 11 नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदार नेमला जाईल. या जहाजातून नाफ्ता काढण्याला सरकारचे प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी आल्तीनो येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नू शि नलिनी नाफ्तावाहू जहाज प्रकरणी चौकशी केली जाईल. मात्र, तत्पूर्वी त्यातील नाफ्ता हटवण्याला प्राधान्य दिले जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, नाफ्तावाहू जहाज मागील 15 दिवसांपासून दोनापावला येथे समुद्रात अडकून पडले आहे. या संदर्भात सरकार कॅप्टन ऑफ पोर्ट, केंद्रीय शिपिंग महासंचालक (डीजी शिपिंग) यांच्या कार्यालयाच्या संपर्कात आहे. डीजी शिपिंगकडून पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून सध्याच्या परिस्थितीवर देखरेख केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नाफ्ता खाली करण्याचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञांना दिले जाणार आहे. या कामासाठी आतापर्यंत दोन जणांनी निविदा पाठवल्या असून सोमवारपर्यंत नू शि नलिनी या जहाजातून कोण नाफ्ता बाहेर काढणार त्याबाबत कंत्राटदारासंबंधी अंतिम निर्णय घेऊन त्याची नियुक्ती केली जाईल. सध्या तरी या जहाजातून कुठलीही तेल गळती होत नसल्याने चिंतेचे कारण नाही. डीजी शिपिंगकडून या जहाजातून नाफ्ता काढण्याचे काम लवकरात लवकर हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

जमीन खरेदी व्यवहार पारदर्शक
दोडामार्ग येथे आपण मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सरकारवर आरोप करण्यास त्यांना मिळत नसल्याने सध्या ते आपल्यावर वैयक्तिक आरोप करीत आहेत. दोडामार्ग येथे आपण जमीन विकत घेतली असून ते आपण नाकारत नाही. सदर जमीन आपण आपल्या पैशातून खरेदी केली आहे. दोडामार्ग येथील ही जमीन गोव्यातील एका व्यक्तीने खरेदी केली होती. तिला ती विकायची असल्याने आपण ती त्याच्याकडून खरेदी केली. या जमिनीबाबत जो व्यवहार झाला तो पारदर्शक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

दोडामार्ग विलीनीकरणाला विरोध दोडामार्गचे गोव्यात विलिनीकरण करावे अशी मागणी 
केली जात आहे. या विलिनीकरणाला आपला विरोध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गोव्याची स्वतंत्र अशी ओळख असून दोडामार्ग गोव्यात विलीन करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.