Mon, May 25, 2020 12:19होमपेज › Goa › आलोक वर्मांची पुन्हा सीबीआय संचालकपदी नियुक्ती करा

आलोक वर्मांची पुन्हा सीबीआय संचालकपदी नियुक्ती करा

Published On: Oct 27 2018 1:37AM | Last Updated: Oct 27 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्यात आल्याच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे  शुक्रवारी  (दि.26) बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वर्मा यांना असंविधानीक पद्धतीने पदावरुन हटवण्यात आले. त्यांची पुन्हा सीबीआय संचालकपदी नियुक्ती करावी. सदर कृतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी केली.

निदर्शनात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नुवेंचे आमदार विल्फ्रेड डिसा, कुंकळीचे आमदार क्लाफासिओ  डायस,  सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, अमरनाथ पणजीकर  व अन्य कार्यकर्ते सहभागी  झाले होते.  आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी जोरदार  घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात मागील साडेचार वर्षात भाजपने देशाला लुटले. राफेल घोटाळाप्रकरणी  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळावेळी आवाज उठवला. याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर त्याचा तपास सीबीआयने सुरु केला. त्यामुळे भयभीत झाल्यानेच पंतप्रधान मोदी यांनी सीबीआय संचालक अलोक वर्मा यांची तडफडकी बदली केली. सदर बदली ही असंविधानिक आहे. 
सीबीआय संचालकांची बदली करण्याचा थेट अधिकार कोणालाही नाही. राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी घाबरल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.   केंद्रातील भाजप सरकार यंत्रणांचा दुरुपयोग करीत असून वर्मा यांची त्वरित सीबीआय संचालकपदी  पुन्हा नियुक्ती केली जावी, अशी मागणीही चोडणकर यांनी केली.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, की सरकार लोकशाही पद्धतीने चालत नाही. सरकारकडून कायद्याचा तसेच सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्ष असताना भाजप नेहमीच सीबीआयकडे एखादे प्रकरण सोपवा, अशी मागणी करीत होते. मात्र, आता तेच सत्तेत येताच  सीबीआयवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला.