Wed, Jul 08, 2020 11:59होमपेज › Goa › दुरुस्त वाहन कायदा तत्काळ लागू करा

दुरुस्त वाहन कायदा तत्काळ लागू करा

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 1:48AM

पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना मगो नेते सुदिन ढवळीकर, शेजारी मगोचे कार्याध्यक्ष नारायण सावंत आणि कोषाध्यक्ष रत्नाकर म्हार्दोळकर. (छाया : समीर नार्वेकर)पणजी : प्रतिनिधी
केंद्र सरकारने दुरुस्त केलेल्या मोटर वाहन कायद्याच्या तरतुदी आणि  त्यानुसार  लागू  दंडाची  राज्यात तातडीने अंमलबजावणी  होणे गरजेचे आहे. सदर कायद्यांतील नव्या कलमांसाठी सुमारे चार वर्षे तयारी करण्यात आली असून काँग्रेस अथवा कुठल्याही  विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी, असे मत मगोचे नेते तथा माजी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांत इनेज येथील मगो मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.

ढवळीकर म्हणाले की, या कायद्यातील दंड आकारणी कमी करण्याचा राज्याला हक्‍क आहे. दंड कमी करूनही राज्य सरकारने सदर कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी. रस्त्यातील खड्डे आणि या कायद्याची अंमलबजावणी हे वेगवेगळे विषय आहेत. गोव्यात सध्या पडलेला पाऊस हा 150 इंचाकडे  पोचला  असून अशा पावसात रस्ते खराब होणारच. सतत पडणार्‍या पावसामुळे खराब रस्त्यांची दुरुस्तीही सध्या करणे शक्य नाही. त्यामुळे केवळ विरोधी काँग्रेसने व  सोशल मीडियावर काहींनी टीका केली म्हणून डिसेंबरपर्यंत कायदा लागू न करणे हे चुकीचे आहे.

मोटर वाहन कायद्यातील दुरुस्तीसाठी नऊ राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांची  खास  समिती  स्थापन करण्यात आली होती. या समितीत आपणही होतो व आपले अनेक प्रस्ताव या कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहेत, त्याबद्दल आपल्याला आनंद वाटत आहे.  भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मागील कार्यकाळात सुमारे चार वर्षे या कायद्याच्या दुरुस्तीसाठी देशातील सर्व राज्यांत फिरले असून चुकार वाहन चालकांना भरमसाठ दंड आकारण्याचा निर्णय विचारपूर्वक आणि अभ्यास  करूनच घेण्यात आला आहे. हा कायदा राज्यात लागू केला तर वाहनचालक, पादचारी, ग्राहक, अपघातग्रस्तांच्या हिताची जपणूक होणार असुन त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही मिळणार असल्याचे  ढवळीकर यांनी सांगितले. 

राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या गोमंतकीयांना तातडीने चतुर्थीच्या आधी नुकसानभरपाई देण्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक करण्यासारखे आहे. याचबरोबर अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या पडलेल्या घरांसंदर्भात  नुकसानभरपाई देण्याची मागणी ढवळीकर यांनी केली. या पत्रकार परिषदेत मगोचे कार्याध्यक्ष नारायण सावंत आणि कोषाध्यक्ष रत्नाकर म्हार्दोळकर हेही उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या आपल्या कारकिर्दीत घटनेचे 370 वे कलम हटविण्याचा  तसेच  तिहेरी तलाकसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेतले. त्याबद्दल तसेच  चांद्रयान-2 मोहिमेबद्दल सुदिन ढवळीकर यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले.