Mon, May 25, 2020 11:05होमपेज › Goa › खाणींबाबत न्यायालयात बाजू मांडू  : पंतप्रधान मोदी 

खाणींबाबत न्यायालयात बाजू मांडू  : पंतप्रधान मोदी 

Published On: Apr 11 2019 2:02AM | Last Updated: Apr 11 2019 12:04AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय कायदेशीर मार्गाने पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गोमंतकीय जनतेची व्यथा आणि रास्त बाजू समर्थपणे मांडू, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. राज्यातील दोन लोकसभा व चार विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचारासाठी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये बुधवारी आयोजित  ‘विजय संकल्प’ सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. 

गोव्यातील लोकसभेच्या दोन  तसेच विधानसभा पोटनिवडणुकीतील चारही जागांवर भाजपलाच विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

खाण अवलंबितांनी दिल्लीत आपली भेट घेतली, त्यावेळी खाणबंदीचा विषय  समजून घेण्यासाठी आपण वेळ दिला. खाणी बंद असल्यामुळे मोठ्या संख्येने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून तो जटील झाल्याचे समजले. केंद्रातील सरकार गोव्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने कार्य करणार असून कोणतीही बाधा दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे,असेही मोदी म्हणाले.

राज्यातील मच्छीमारांना नील क्रांती योजनेंतर्गत  क्रेडिट कार्ड पद्धतीने कर्ज वितरीत केले जाणार आहे.खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारकडून खास उपग्रहाद्वारे हवामानाचा अंदाज आणि मुबलक मत्स्यपीक कुठे मिळेल, याची माहिती देणारी ‘नाविक यंत्रणा’ उपलब्ध करू, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.

गोव्यात भाजप सत्तेत आल्यामुळे गेल्या कित्येक वर्षात झाला नव्हता तेवढा  पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. पर्यटनविकासातही गोवा अग्रेसर असून या क्षेत्रात रोजगारसंधी वाढाव्यात यासाठी यापुढेही केंद्र सरकारकडून मदतीचा हात कायम राहील, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, पणजीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर  राज्यातील पर्यटनक्षेत्राचा विकास होण्यासाठी  अटल सेतू, मोपा आंतरराष्ट्रीय  विमानतळ, दाबोळी विमानतळाचे आधुनिकीकरण, मडगाव-राजधानी एक्स्प्रेस, डबल डेकर ट्रेन, असे विविध प्रकल्प भाजप सरकारने मार्गी लावल्याने  गोव्याशी  इतर जगाची कनेक्टिव्ही वाढली आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली असून   येत्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल होतील व रोजगारसंधीही वाढतील,असेही मोदी म्हणाले. 

संकल्प सभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत,  लोकसभेचे उमेदवार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक तसेच अ‍ॅड.नरेंद्र सावईकर,उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर,आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे,माविन गुदिन्हो, मायकल लोबो, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, रमेश तवडकर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन माजी आमदार दामू नाईक यांनी केले.  

मोदी ‘अंत्योदय’साठी झटणारे नेते : मुख्यमंत्री

अंत्योदयाचा विचार बाळगणारे नेते अर्थात प्रधान चौकीदार पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देश सुरक्षित आहे,असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.ते म्हणाले,देश सुरक्षित ठेवण्यासाठी धाडसाने सर्जिकल स्ट्राईक  सारखे  निर्णय अंमलात आणण्याचे धारिष्ट्य दाखवण्यामागची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच आहे.गोमंतकीय जनतेने  दोन्ही खासदार तसेच विधानसभा पोटनिवडणुकीतील चारही जागा भाजपला मिळवून देऊन प्रधान चौकीदारांचे हात बळकट करावेत.

‘पर्रीकरांची स्वप्नपूर्ती ही सर्वांची जबाबदारी’

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास कसा साधावा, याचा मार्ग आधुनिक गोव्याचे शिल्पकार स्व.मनोहर पर्रीकर यांनी दाखवून दिला आहे. ते आपल्यात नसले तरी,त्यांनी त्यांच्या स्वप्नातला गोवा साकारणे ही सर्वांची जबाबदारी आहे.पर्रीकरांचा वारसा पुढे नेण्यासाठी युवा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत पुढे सरसावले आहेत. त्यांच्या पाठीशी दिल्ली सदैव राहील,अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.