Wed, May 27, 2020 04:35होमपेज › Goa › भाजपचा जाहीरनामा हे ‘विकासपत्र’ नव्हे ‘विनाशपत्र’

भाजपचा जाहीरनामा हे ‘विकासपत्र’ नव्हे ‘विनाशपत्र’

Published On: May 14 2019 2:02AM | Last Updated: May 14 2019 12:06AM
पणजी : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने पणजी पोटनिवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला असून त्याला संकल्प विकास पत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजप गेली 25 वर्षे पणजीवर राज्य करत असून आता संकल्प करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भाजप दर निवडणुकीत तीच आश्‍वासने, त्याच मुद्द्यांचा समावेश करून जनतेला ग्राह्य धरत आहे. त्यामुळे भाजपचा जाहीरनामा हा संकल्प विकासपत्र नव्हे तर विनाशपत्र आहे ,अशी टीका करून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. 

पणजीकर म्हणाले, भाजप ने 2012 तसेच 2017 च्या निवडणुकांमध्येही जी आता दिली आहेत तीच आश्‍वासने दिली होती. भाजपने जाहीरनाम्यात वीज, पाणी, कचरा या प्रश्‍नांचा समावेश केला,यावरूनच गेली 25 वर्षे पणजीचा विकास करण्यात ते अपयशी ठरले आहेत हे दिसून येते. स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजीचे आमदार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले आहेत हे देखील भाजपच्या त्याच त्या आश्‍वासनांवरून दिसून येते.

कॅसिनो मुद्दा मात्र भाजप च्या जाहीरनाम्यातुन गायब झाला आहे. ज्या कॅसिनोला मांडवी बाहेर काढण्यासाठी भाजप ने मशालयात्रा काढली तो विषय भाजप जाहीरनाम्यातून गायबच झाला आहे. ज्या विषयावरून भाजप ने राजकारण करून सत्ता मिळविली त्याच विषयाला भाजप आज विसरले आहे,अशी टीकाही त्यांनी केली.

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प हा भ्रष्टाचार आहे. वेळोवेळी काँग्रेसने त्याचे पुरावे सादर केले आहेत. रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यापेक्षा पणजीत आहेत, त्याच रस्त्यांची डागडुजी आवश्यक आहे. पणजीवासीयांना वीज, पाणी , रोजगार हवा असून तो फक्त काँग्रेस देणार आहे. त्यामुळे पणजीवासीयांनी विकासासाठी काँग्रेसवर विश्‍वास ठेवून काँग्रेससोबत रहावे, असे आवाहन पणजीकर यांनी केले. 
पत्रकार परिषदेत प्रसाद आमोणकर, अ‍ॅश्टन सांता मारिया व विनिशा गास्पर डिसोझा उपस्थित होत्या.