Tue, May 26, 2020 06:12होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचे 11 डिसेंबरनंतर वाटप

मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचे 11 डिसेंबरनंतर वाटप

Published On: Nov 23 2018 1:19AM | Last Updated: Nov 23 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 11 डिसेंबरपर्यंत आपल्याकडील सर्व  खात्यांचे वाटप करणार नाहीत.  मात्र, 11 डिसेंबरनंतर केंद्रीय भाजप नेत्यांच्या सल्ल्यानंतर कधीही हे खातेवाटप केले जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. 

येथील भाजप मुख्यालयात गुरुवारी सकाळी भाजप गाभा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे तिन्ही खासदार, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, अ‍ॅड. नरेंद्र सावईकर आणि विनय तेंडुलकर उपस्थित होते. तसेच दामू नाईक, सुभाष फळदेसाई आदी सदस्यही हजर होते. मात्र, माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर आणि दयानंद मांद्र्रेकर हे गैरहजर होते. 
तेंडुलकर यांनी सदर बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, ही नियमित   बैठक होती. यात अन्य महत्त्वाचे सांगण्यासारखे काहीही नाही. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सदस्यांनी चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणूक आणि दोन पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येण्यासाठी सभा, संमेलन आयोजित करण्यावर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. 

मंत्री ढवळीकर- खंवटेंची नाराजी दूर 

भाजप गाभा समितीच्या चार सदस्यांनी बुधवारी रात्री उशिरा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांची अल्तिनोवरील बंगल्यावर भेट घेतली. याशिवाय, अपक्ष आमदार तथा महसूल मंत्री रोहन खंवटे यांचीही बुधवारी भेट घेतली. त्या सर्वांची नाराजी दूर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर आणि खजिनदार संजीव देसाई या नेत्यांनी या दोन्ही मंत्र्यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजले नसले तरी सरकारबद्दल असलेली त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.