Mon, May 25, 2020 03:22होमपेज › Goa › ताळगाव पंचायतीवर मोन्सेरात गटाचे सर्व उमेदवार विजयी

ताळगाव पंचायतीवर मोन्सेरात गटाचे सर्व उमेदवार विजयी

Published On: Apr 30 2019 1:55AM | Last Updated: Apr 30 2019 1:55AM
पणजी : प्रतिनिधी

ताळगाव पंचायतीवर माजी मंत्री अतानासिओ (बाबूश) मोन्सेरात यांचा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध झाला असून, मोन्सेरात समर्थक उमेदवार सर्व अकराही प्रभागांत विजयी झाले आहेत. ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाल्यावर येथील बालभवन केंद्रात सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी हाती घेण्यात आली. सदर पंचायत निवडणुकीत ‘ईव्हीएम’ यंत्राऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला होता. पहिल्या प्रभागापासूनचा निकाल मोन्सेरात यांच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट पॅनेल’मधल्या उमेदवारांच्या बाजूने येण्यास सुरुवात झाल्यावर बालभवनच्या समोर मोन्सेरात समर्थकांनी गर्दी करून घोषणा देण्यास सुरवात केली. 

ताळगावच्या सर्व अकराही प्रभागांचा निकाल 11 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला. यानंतर बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी तथा आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली विजयी उमेदवारांची मिरवणूक ताळगाव भागात काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मोन्सेरात समर्थक दुचाकी आणि खुल्या वाहनांतून यामध्ये सहभागी झाले. 

ताळगाव पंचायतीच्या प्रभाग -1 मधून रेघा सुनिल पै, प्रभाग -2 मधून तेरेझिना बारेटो, प्रभाग -3 आग्नेल दा कुन्हा (बिनविरोध), प्रभाग - 4 महादेव कुंकळकर, प्रभाग -5 मधून सरस्वती देवदास मुरगावकर, प्रभाग -6 मधून एस्टेला डिसोझा, प्रभाग -7 जानू रोझारिओ, प्रभाग -8 मधून मारिया फर्नांडिस, प्रभाग -9 मधून रघुवीर कुंकळ्येकर, प्रभाग -10 मधून संतोष चोपडेकर, प्रभाग- 11 मधून सिडनी बॅरेटो यांचा विजय झाला. मोन्सेरात यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवार फक्त जिंकले नसून त्यांना आपल्या प्रभागातील 60 टक्के मतेही प्राप्त झाली असल्याचे मतदानाच्या आकडेवारीतून आढळून येते. 

बाबूश मोन्सेरात म्हणाले की, आपल्या पॅनेलच्या यशाचे श्रेय ताळगाववासीयांना असून आपल्यावर त्यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला आपण पात्र ठरण्याचा प्रयत्न करू. आपल्या गैरहजेरीत पत्नी जेनिफर यांनी प्रचारासाठी परिश्रम घेतले आहेत. 

आता ‘मिशन पणजी’: मोन्सेरात

पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जवळ असलेली पंचायत जिंकणे ही आपल्यासाठी आनंदाचे आणि बळ देणारी घटना आहे. आपल्या मते लहान-मोठा प्रत्येक विजय महत्वाचा असतो. आता आपले पुढचे पाऊल पणजी जिंकणे असून ‘मिशन पणजी’साठी जोरात प्रचार सुरू करणार असल्याचे बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.