Thu, May 28, 2020 07:00होमपेज › Goa › रॉयल्टी भरल्यानंतर कंपन्यांना खनिजमाल वाहतुकीला मुभा

रॉयल्टी भरल्यानंतर कंपन्यांना खनिजमाल वाहतुकीला मुभा

Last Updated: Feb 13 2020 12:11AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

सरकारला ‘रॉयल्टी’ भरलेल्या  आणि राज्यात विविध जेटी, प्लॉट व अन्य ठिकाणी पडून असलेल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी सर्व संबंधित खाण कंपन्यांनी खाण खात्याकडे अर्ज केले आहेत. याशिवाय, राज्यात रॉयल्टीचा भरणा  न केलेला  खनिज मालही पडलेला असून खाण कंपन्यांकडून सरकारी दरबारी सदर रॉयल्टी  भरल्यानंतर त्याची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार आहे. सुमारे 9.4 दशलक्ष टन खनिजमाल वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिली. 

आल्तिनो येथे एका सरकारी कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री सावंत यांनी सदर माहिती दिली. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनुसारच सदर ‘रॉयल्टी’ भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीसाठी राज्य सरकारकडून परवानगी दिली जाणार आहे. यासाठी राज्यातील संबंधित खाण कंपन्यांकडून खाण व भूगर्भ खात्याकडे अर्ज आलेले आहेत. सुमारे 9 मेट्रिक टन खनिज माल पडून असून या मालाची ‘रॉयल्टी’ सरकारकडे आधीच भरण्यात आली आहे. या अर्जांना मान्यता मिळाल्यानंतर खनिज वाहतुकीला  सुरुवात होणार आहे.

राज्यात खाण महामंडळ स्थापन करण्याबाबत अजूनही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या 22 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात खाणीसंबंधी आणखी एक प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यानंतरच याविषयी विचार केला जाईल. मात्र, खाण महामंडळ स्थापन करण्याबाबतीत सरकारने पूर्वतयारी केलेली असून अजूनही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.