Sun, May 31, 2020 15:36होमपेज › Goa › पणजीत मूलभूत गरजा पुरवण्यास भाजपला अपयश

पणजीत मूलभूत गरजा पुरवण्यास भाजपला अपयश

Published On: May 16 2019 2:04AM | Last Updated: May 16 2019 12:14AM
पणजी : प्रतिनिधी

मागील 25 वर्षात भाजपला पणजीच्या सांतइनेज खाडीचा प्रश्‍न सोडवता आला नाही. 1994 ते  2019 या कालावधीत सांतइनेझ खाडीची स्थिती जैसे थे असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. यतिश नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावरुन भाजपला हा विषय सोडवण्याची इच्छाशक्‍तीच नाही. भाजपला पणजीतील मूलभूत गरजा पुरवण्यास अपयश आहे,  अशी टीका  नाईक यांनी केली.

अ‍ॅड. नाईक म्हणाले, की मनोहर पर्रीकर हे 25 वर्षे म्हणजेच 1994 पासून पणजीचे आमदार होते. 1994 साली भाजपने सांतइनेज खाडी स्वच्छ करुन त्याचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, याला आत्ता 25 वर्षे उलटली असून 2019 उजाडले तरी सांतइनेज खाडीची स्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

भाजप केवळ पणजीला स्मार्ट सिटी करण्यावर बोलत आहे. प्रत्यक्षात पणजी अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वीज, पाणी रस्ते, सांतइनेज खाडीची स्वच्छता , कचरा प्रकल्प उभारणे आदी गरजा अजूनही पुरवण्यात भाजपला अपयश आले  आहे. भाजप 1994 पासून ते 2019   असे 25 वर्ष तीच तीच आश्‍वासने देत आहे. मात्र, त्यांची पूर्तता अद्यापही झालेली नाहीत. यावरुन भाजपला हा विषय सोडवण्याची इच्छाशक्‍तीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे हे अपयश असून त्यांनी पणजीला पुढे नव्हे तर मागे नेले असल्याची टीका  अ‍ॅड. नाईक यांनी  केली.

या सर्वाला भाजपने उत्तर देणे अपेक्षित आहे.  पणजीच्या मतदारांना पणजीचा विकास हवा आहे. त्यामुळे आगामी पणजी पोटनिवडणुकीत मतदार भाजपला योग्य तो धडा शिकवणार असल्याचेही  नाईक म्हणाले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे विजय पै, देवानंद नाईक, बाबी बागकर व अन्य उपस्थित होते.