Mon, May 25, 2020 13:24



होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कृती : कामत

म्हादईप्रश्‍नी कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कृती : कामत

Last Updated: Nov 01 2019 1:23AM




पणजी : प्रतिनिधी 
कर्नाटकाला म्हादई नदीतील पाणी वापरण्यासाठी कळसा भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण दाखला दिल्याप्रकरणी काँगे्रसच्या कायदेतज्ज्ञांकडून पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. या तज्ज्ञांकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार, सदर दाखल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अथवा राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्याचे निश्चित केले जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथील काँग्रेस भवनात पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले.

कामत म्हणाले की, केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकातील कळसा भांडुरा प्रकल्पाला पर्यावरण दाखला दिल्याप्रकरणी काँग्रेसकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाच्या कायदेतज्ज्ञांकडून सदर प्रकरणाचा अभ्यास सुरू असून या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील पावले कशी टाकायची याबाबत विचार केला जाणार आहे. त्यानंतर सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात की राष्ट्रीय हरित लवादाकडे जायचे ते ठरविले जाणार आहे. याआधी कामत यांनी म्हादई प्रश्‍नावर राज्य विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर मागणी फेटाळली होती. 

नाफ्ता जहाजाची चौकशी करा

राज्यात नाफ्ताचा फक्त जुवारी अ‍ॅग्रो कंपनीकडून वापर केला जात असून सध्या नाफ्ता आयात करणेही बंद करण्यात आलेले आहे. याशिवाय, मुरगाव बंदराहून थेट जुवारी अ‍ॅग्रो कंपनीपर्यंत नाफ्ता वाहण्यासाठी स्वतंत्र वाहिनी उभारण्यात आली होती. काही काळासाठी रिलायन्स कंपनीसाठीही नाफ्ता आणला जात होता. मात्र, आता गोव्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नाफ्ता सदर जहाजातून कुणी आणि कशासाठी आणला, याची माहिती सरकारने उघड करण्याची गरज आहे. जर या प्रकरणात कुणी मंत्री सामील असेल तर त्याची चौकशी करून सदर माहिती उघड करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.