Wed, Jul 08, 2020 12:38होमपेज › Goa › प्रवासी मिळवण्याच्या प्रयत्नात अपघात 

प्रवासी मिळवण्याच्या प्रयत्नात अपघात 

Last Updated: Oct 21 2019 1:31AM
मडगाव : प्रतिनिधी

जास्तीत जास्त प्रवासी मिळवण्यासाठीच्या जीवघेण्या  शर्यतीत केपे-मडगाव मार्गावर धावणार्‍या दोन प्रवासी बसेसच्या रावणफोंड येथील लकाकीजवळ झालेल्या अपघातात बसमधील नऊ प्रवाशांसह दोन दुचाकीस्वार जखमी झाले.

रविवारी दुपारी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अकरा जणांना  हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले असून निष्काळजीपणे बस हाकून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बसचे परमिट आणि चालकाचा परवाना रद्द करण्याची शिफारस वाहतूक खात्याकडे करणार असल्याचे मायणा कुडतरी पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार  हा अपघात रविवारी लकाकीजवळ घडला. सविस्तर माहितीनुसार मडगाव ते सांगे व्हाया केपे या मार्गावर धावणारी  जी ए 09 यू 5803 या क्रमांकाची धारिया ही बस दुपारी मडगावच्या कदंब बस स्थानकावरून प्रवाशी घेऊन केपेच्या मार्गाने निघाली होती. सदर बस सुटल्यानंतर वीस मिनिटांनी डेलिशा ही जी ए 09 यू 5758 ही बस कदंब बस स्थानकावरून सुटली होती. दोन्ही बसेस प्रवाशांनी भरलेल्या होत्या. पुढे निघालेली बस उशीर होऊन सुद्धा हळू जात असल्याचे डेलिशा बस चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने त्या बसला मागे टाकण्यासाठी आपली बस वेगाने हाकण्यास सुरू केले. पाजिफोंड येथून दोन्ही  बसेस मध्ये  शर्यत लागली होती.प्रवाशी मिळविण्यासाठी दोन्ही बसेस एकमेेकांपुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होते. रविवार असल्याने या मार्गावर फारशी वाहतूक नव्हती. पाजीफोंड येथून सुरू असलेली शर्यत लकाकी पर्यँत सुरू होती.

मागे असलेल्या जी ए 09 यू 5758 बसच्या चालकाने वेगाने बस पुढे नेऊन पुढे जात असलेल्या जी ए 09 यू 5803 क्रमांकाच्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान समोरून अन्य एक गाडी येत होती. तिला चुकवण्याच्या नादात मागील बसने पुढील बसला धक्का दिला. याच वेळी जी ए 08 व्हाय 3575 ही दुचाकी घेऊन शेख अहमद (सां जुजे आरियल)आणि कबीर काळे (लकाकी) हे दोन युवक समोरून येत होते. बसच्या धडकेत तेही बाजूला फेकले गेले. त्या दोघांच्या डोक्याला व हाताला मार बसला आहे. या अपघातात जखमी झालेले सर्व प्रवाशी जी ए 09 यू 5758 या क्रमांकाच्या बस मधील आहेत. यात जॉनिता मस्कारेन्हास (रा.काकोडा, वय 52 ), मनीषा च्यारी (केपे, 42),पद्मा नरीखुल ( मळकर्णे, 52 ), शंकराली नरीखुल (मळकर्णे,   65), बसवराज चव्हाण (सावर्डे,20), कमल गोपाळ (गुडी पारोडा,18), भुवनेश्वर गोपाळ (रा.गुडी,27 ), जयचंद केतकी (रा.गुडी,30 )  आणि जास्मिन मेंडोका (रा.केपे, 18 ) यांचा समावेश आहे.

या सर्वांना मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करून प्राथमिक तपासणीनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक तेजस यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताला  कारणीभूत बसचा चालक अँथनी रिबेलो याला ताब्यात घेण्यात आले आहे. बस चालकाचा परवाना आणि बसचा परवाना रद्द करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.