Thu, May 28, 2020 05:47होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यानी दोडामार्गमधील जमीनीबाबत स्पष्टीकरण द्यावे : काँग्रेसचे पवन खेर

मुख्यमंत्र्यानी दोडामार्गमधील जमीनीबाबत स्पष्टीकरण द्यावे : काँग्रेसचे पवन खेर

Last Updated: Nov 17 2019 1:22AM
पणजी ः प्रतिनिधी

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोडमार्गाच्या परिसरात विकत घेतलेल्या 2666 एकर जमिनीबाबत जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे निमंत्रक पवन खेर यांनी शनिवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जनतेचे हित जपलेले नसून जनतेच्या कल्याणासाठी कुठल्याही योजना अंमलात आणलेल्या नाहीत. तसेच त्यांना जनतेची तमाही नाही. शेजारच्या राज्यातील जमिनी  स्वस्त दरात विकत घेऊन मोठे जमीनदार बनणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्र्यानी मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी,2017 मध्ये निवडणूक अधिकार्‍यांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोडामार्ग येथे त्यांच्या नावावर 2666 एकर कृषीजमीन नोंदणी झालेली असून 2016 मध्ये ती जमीन त्यांनी 38 लाख रुपयांना विकत घेतल्याचे नमूद केले होते. ती सर्व जमीन कृषी क्षेत्राची असून सध्या त्या जमिनीत खडीचे क्रशर सुरु करण्यात आलेले आहेत.

 तसेच ठेकेदार मुख्यमंत्र्याच्या जमिनीतून क्रशरने काढलेल्या खडीचा पुरवठा गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाला करीत आहे. मुख्यमंत्र्याची जमीन कृषी क्षेत्र असताना त्या जमिनीत खडी क्रशरचा बेकायदा व्यवसाय कसा सुरू करण्यात आला, असा सवाल खेर यांनी उपस्थित केला.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यानी दोडामार्ग भागात अतिरिक्त 4 एकर जमीन 14 लाख रुपयांना  विकत घेतलेली आहे. ती जमीन कृषी क्षेत्राची असली, तरी त्या जमिनीचा व्यवसायिक दृष्टीकोनातून वापर करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यासाठी दोडामार्गाचा भाग गोव्यात समाविष्ट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रश्नांची मुख्यमंत्र्यानी उत्तरे द्यावीत, अन्यथा राजीनामा द्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर, ट्रोजन डिमेलो, अमरनाथ पणजीकर, खेमलो सावंत व इतर सदस्य पत्रकार परिषदेला उपस्थित 
होते.