Mon, May 25, 2020 10:01होमपेज › Goa › उच्च न्यायालयात ‘आप’ची याचिका

उच्च न्यायालयात ‘आप’ची याचिका

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 17 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

मडगावच्या घाऊक बाजारात मासळीत फार्मोलिन आढळल्या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली  चौकशी व्हावी, अशी मागणी   ‘आम आदमी’ पक्षाने  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात     याचिकेद्वारे केली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते वाल्मीकी नाईक यांनी दिली. नाईक म्हणाले, अन्न व औषध  प्रशासन, दक्षिण गोवा पीडीए, मडगाव पालिका,     आरोग्य खाते व पोलिस  खाते या सार्वजनिक  संस्थांचीही चौकशी व्हावी, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

मासळीमधील फार्मोलिनबाबत ‘एफएसएसएआय’च्या अंमलबजावणी  विभाग संचालिका गरीमा नाईक यांनाही तक्रार देण्यात आली आहे. ‘एफएसएसएआय’ ही अन्न व औषध प्रशासनाची पालक संस्था   असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मासळी ताजी ठेवण्यासाठी  फार्मोलिनचा  वापर मासळी व्यावसायिकांकडून केला जातो. मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. परंतु या सार्वजनिक संस्था  जनतेच्या आरोग्याशी खेळण्यास मासळी व्यावसायिकांना संधी देतात. प्रत्यक्षात या बाबींवर या सार्वजनिक संस्थांकडून कारवाई अपेक्षित असली तरी दबावाखाली कारवाई होत  नसल्याचेही नाईक यांनी  सांगितले.

‘आप’चे नेते एल्विस गोम्स  म्हणाले, फार्मोलिनप्रश्‍नी आपण जातीने लक्ष घालत असल्याचे  आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात अन्न व औषध प्रशासनाचा एकही अधिकारी  बाजारात  पाहणी करताना आढळून येत नाही.  प्रशासनाच्या कार्यालयाला जर पोलिस संरक्षण दिले जाऊ शकते तर मग अन्न व औषध निरीक्षकांना का नाही, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.