Thu, May 28, 2020 07:52होमपेज › Goa › गोव्यात 9 नवे कोरोनाबाधित

गोव्यात 9 नवे कोरोनाबाधित

Last Updated: May 18 2020 1:45AM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा 

गोव्यात गेल्या पाच दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रविवारी (दि. 17) 22 वर पोहचली आहे. ही संख्या शनिवारी 13 होती. यात रविवारी एक कामगार आणि राजधानी एक्स्प्रेसमधल्या आणखी आठ प्रवाशांचा समावेश असून, त्यांचा रविवारी अंतिम अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने एकूण रुग्णसंख्या 22 वर पोहोचली असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात कोरोनाबाधित 7 रुग्ण आधीच बरे होऊन घरी गेले असून 3 एप्रिलनंतर सुमारे 40 दिवसांनंतर बुधवारी सात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले होते. यात, गुरुवारी एक आणि शनिवारी पाच मिळून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 झाली होती. राज्यातील उद्योगांमध्ये कामगारांची वाणवा असल्याने अनेक उद्योजकांनी घरी गेलेल्या आपल्या कामगारांना परत येण्याचे आवाहन केले असून, कारवारहून पोळे चेक नाक्यावरून प्रवेश केलेले दोन कामगारही कोरोनाबाधित असल्याचे रविवारी सिद्ध झाले. याशिवाय, मडगावी राजधानी एक्स्प्रेसने उतरलेल्या आणखी सात प्रवाशांचा अहवाल रविवारी ‘पॉझिटिव्ह’ आला असून या प्रवाशांपैकी एक महिला आहे. यामुळे रविवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे.

गोमेकॉत आता दररोज दोन हजार चाचण्या शक्य

राज्यातील सीमेवरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी व कामगार राज्यात प्रवेश करत असल्याने मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळ, म्हापसाच्या आझिलो इस्पितळ आणि फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात जलद ‘ट्रुनेट’ चाचण्या करण्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य खात्यात अतिरिक्‍त ‘मायक्रोबायोलॉजिस्ट’ व तंत्रज्ञ नेमण्यात येणार आहेत. गोमेकॉत दीड कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक ‘अ‍ॅबोट एम-2000 पीसीआर’ यंत्र बसवण्यात आले आहे. यामुळे राज्यात दिवसाला सुमारे दीड ते 2 हजार संशयितांवर कोरोनासंबंधी चाचणी करता येणे शक्य असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी रविवारी सांगितले.