Mon, May 25, 2020 12:41होमपेज › Goa › फोंडा पालिकेसाठी ७६ टक्के मतदान

फोंडा पालिकेसाठी ७६ टक्के मतदान

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 1:41AMफोंडा : प्रतिनिधी

फोंडा नगरपालिकेच्या 15 प्रभागांसाठी रविवारी 76.43 टक्के मतदान झाले असून, 74 उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत सीलबंद झाले. सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. 14 मध्ये 82.75 टक्के, तर प्रभाग क्र. 12 मध्ये 68.33 टक्के इतके कमी मतदान झाले. 

पंडितवाडा फोंडा येथे आमदार रवी नाईक व मगोचे केतन भाटीकर आणि राजेश वेरेकर यांच्यात झालेली शाब्दिक चकमक वगळता मतदान  शांततेत पार पडले. दि. 7 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी होणार आहे.

निर्वाचन अधिकारी विशाल कुंडईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानाची प्रभागवार टक्केवारी पुढीलप्रमाणे-प्रभाग क्र. 1 - 77.55, प्रभाग क्र. 2 - 74.81, प्रभाग क्र. 3 - 74.46, प्रभाग क्र. 4- 77.69, प्रभाग क्र. 5 - 74.67, प्रभाग क्र. 6 - 78.32, प्रभाग क्र. 7 - 77.31, प्रभाग क्र.  8 - 80.69, प्रभाग क्र. 9-71.89, प्रभाग क्र. 10-82.36, प्रभाग क्र. 11-79.59, प्रभाग क्र. 12-68.33, प्रभाग क्र. 13-73.81, प्रभाग क्र. 14-82.75, व प्रभाग क्र. 15 मध्ये 73.93 टक्के मतदान झाले असून पंडितवाडा येथील अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.  

विविध मतदान केंद्रांत सकाळी 8 वाजल्यापासून मतदारांची मतदानासाठी गर्दी दिसून आली. सेंट मेरी हायस्कूलमधील मतदान केंद्र, दुर्गाभाट मतदान केंद्र व सदर-फोंडा येथील इंग्लिश हायस्कूल केंद्रावर काही प्रमाणात गर्दी दिसून आली. सर्व केंद्रांवर कडक नजर ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे 200 हुन अधिक पोलिस तैनात ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांनी दिली. सेंट मेरी मतदान केंद्राजवळ उमेदवारांची गर्दी दिसून आली. आमदार रवी नाईक तेथील जवळच्याच बसथांब्यावर  बसून राहिल्याने इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची बरीच तारांबळ उडाली. मात्र उन्हाच्या वाढत्या झळांमुळे दुपारी 1 वाजल्यानंतर भाजप व मगो कार्यकर्त्यांची संख्या मतदान केंद्रांवर कमी झाल्याचे दिसून आले. सेंट मेरी केंद्राजवळ संध्याकाळी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याने निर्धारित वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास  उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. 

आमदार रवी नाईक यांनी सांगितले की, पंडितवाडा येथे मतदान केंद्र नाही. तेथे आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यावेळी केतन भाटीकर यांनी आपल्याला तेथून जाण्याची विनंती केली. मतदारसंघात फिरताना आमदारांना माघारी जा, असे सांगण्याचा कोणताच अधिकार केतन भाटीकर यांना नाही. 

आमदार नाईक, केतन भाटीकर यांच्यात चकमक

आमदार रवी नाईक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पंडितवाडा येथे जाऊन झाडाखाली बसले असता केतन भाटीकर यांनी तिथे जाऊन आमदारांना तेथून जाण्याची विनंती केली. त्यामुळे आमदार रवी नाईक यांनी आपण फोंड्याचे आमदार असून, आपल्या मतदारसंघात फिरताना कुणीच रोखू शकत नसल्याचे सांगताच दोघांत शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी राजेश वेरेकर तिथे पोहोचल्यानंतर स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून भरारी पथकाने सर्वांना बाजूला करून स्थिती नियंत्रणात आणली. आमदार नाईक सर्वप्रथम पंडितवाडा येथे गेले. मात्र, तिथे केतन भाटीकर यांच्याशी वाद झाल्यानंतर सरळ सेंट मेरी मतदान केंद्रासमोर असलेल्या बसथांब्यावर जाऊन बसले. त्यामुळे पोलिसांसह कार्यकर्ते यांची धावपळ उडाली.