Wed, May 27, 2020 18:10होमपेज › Goa › सामाजिक कल्याण योजने अंतर्गत 675 कोटींचा खर्च

सामाजिक कल्याण योजने अंतर्गत 675 कोटींचा खर्च

Last Updated: Feb 05 2020 2:30AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने गोमंतकीयांवर विविध सामाजिक कल्याण योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षात सुमारे 675 कोटी रुपयांचा निधी खर्च केला असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.  

गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांनी विचारलेल्या अतारांकीत प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली. राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर वाढत असून यातील बहुतांश निधी सामाजिक योजनांची पूर्तता करण्यासाठी वापरला जात असल्याचे आढळून आले आहे.

साळगावकर यांना मिळालेल्या लेखी उत्तरात  म्हटले आहे, की राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार्‍या ‘गृह आधार’ योजनेसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 161.22 कोटी रुपये खर्च   केले  असून या योजनेचे1 लाख 33 हजार 718 लाभार्थी आहेत. ‘दयानंद सामाजिक सुरक्षा ’योजनेअंतर्गत  1 लाख 36 हजार 874 लाभार्थी असून ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग आणि एड्सबाधित रुग्णांना दरमहा प्रत्येकी 2 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

दिव्यांग विद्यार्थ्यांना  2500 रुपये आणि अपंगत्वाचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक असलेल्या दिव्यांग  व्यक्तीला दरमहा 3500 अनुदान दिले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत  255 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘लाडली लक्ष्मी ’ योजनेअंतर्गत  3183 युवतींच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी ठेव रूपाने बँकेत ठेवला असून या योजनेअंतर्गत 204 कोटींचे अनुदान आतापर्यंत वितरीत करण्यात आले आहेत.

तसेच, पशुसंवर्धन खात्याच्या ‘कामधेनू’ योजनेअंतर्गत 90 कोटी  रुपयांचे अनुदान  वितरीत करण्यात आले आहेत.तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या ‘सायबरएज’ योजनेखाली मागील तीन आर्थिक वर्षात 148 कोटी रुपये खर्चण्यात   आले आहे. या लोककल्याणकारी  योजनांमुळे राज्याच्या तिजोरीतून सुमारे 675 कोटीं रुपये  खर्चण्यात आले असल्याचे या उत्तरातून स्पष्ट होत आहे.