Wed, Jul 08, 2020 12:33होमपेज › Goa › गुंतवणूकदारांची ३ कोटींची फसवणूक प्रकरण

सहा वर्षे फरार भामटा आनंद तांबे ठाण्यात जेरबंद

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:50PMमडगाव : प्रतिनिधी 

गोवा आणि महाराष्ट्रातील 129 गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याच्या आमिषाने  सुमारे  तीन कोटी रुपयांना गंडा घालणारा आणि सहा वर्षांपासून फरार असलेला वॉन्टेड यादीतील संशयित आनंद शिवराम तांबे (वय 49) याला ठाणे-मुंबई येथून गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले.

तांबे आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात 2012 मध्ये मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. इतर चार संशयितांची अटकेनंतर जामिनावर सुटका झाली होती, तर आनंद शिवराम तांबे हा पोलिसांच्या हाती न लागता पसार झाला होता. तो ठाण्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने ठाणे-मुंबई येथून तांबे याला अटक केली. तांबे याला जेएमएफसी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद तांबे हा मूळ तिस्कगाव कल्याण (पूर्व) येथील रहिवाशी आहे. 2012 साली त्याच्यावर भा.दं.सं. कलम 429, 120 ब अन्वये गुन्हा नोंदवला होता. तांबे हा मेसर्स शिने मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता.सदर कंपनी लोकांचे पैसे गुंतवून त्यांना मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवत होती. लोकांनी सुमारे तीन कोटी रुपये कंपनीत गुंतवले होते.दिलेल्या वेळेत पैसे न आल्याने आणि या काळात कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने आपण लुबाडलो गेल्याचे लोकांना कळून चुकले होते. आणि सुमारे 129 लोकांनी मडगाव पोलीस ठाण्यात तांबे व अन्य दोघांविरोधात तक्रार नोंदवली होती.

लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूपसिंग भानू (जयपूर-राजस्थान), आकाश मत्तिकोप (मडगाव), संजय आमोणकर (मालभाट-मडगाव), शरद शिरोडकर (नावेली) आणि सुरज फातर्पेकर (नावेली) यांना अटक केली होती. त्यांची नंतर जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणातील अन्य संशयित शान ईलाही (नवी दिल्ली) आणि मोहन केशवानी (राजस्थान) हे अजून फरारी आहेत. पोलिसांनी तांबे याला ताब्यात घेऊन त्याचे बँक व्यवहार आणि इतर मालकी वस्तूंची माहिती मिळवली आहे. मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांना विचारले असता, त्याला मडगाव पोलिसांच्या ताब्यात अजून देण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.