Thu, Jul 02, 2020 14:38होमपेज › Goa › टोंका प्रकल्पात २८ टँकर रोखले

टोंका प्रकल्पात २८ टँकर रोखले

Last Updated: Oct 18 2019 1:49AM
पणजी : प्रतिनिधी
ओला कचरा घेऊन गेलेल्या पणजी-ताळगावच्या तीन ट्रकांना साळगाव कचरा प्रकल्पात गेले तीन दिवस प्रवेश देण्यात आला नाही. ओल्या कचर्‍याची वाहतूक करणार्‍या ट्रकांसाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनही अडवणूक केली जात असल्याने पणजी महानगरपालिकेने टोंका-पणजी येथील मलनिस्सारण प्रकल्पात उत्तर गोव्यातून आलेल्या 28 ‘नाईट सॉईल टँकर’ना बुधवारी प्रवेश दिला नाही. 

यामुळे, आता साळगाव कचरा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून पणजी-ताळगावच्या ट्रकांना प्रवेश देण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय नाईट सॉईल टँकर्सना प्रवेश देणार नाही, असा इशारा पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी बुधवारी दिला. 

महानगरपालिकेत महापौरांच्या कक्षात खास बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मडकईकर बोलत होते. ते म्हणाले की, उत्तर गोव्यातून टोंका-पणजी येथील मलनिस्सारण प्रकल्पात दररोज सुमारे 100 नाईट सॉईल टँकर्सना प्रवेश दिला जातो. पर्यटन हंगामाच्या काळात हीच संख्या 120 टँकर्सवर पोहचते. या टँकर्सच्या वर्दळीचा स्थानिकांना त्रास होत असून वाहतूक कोंडी होणे, पदपथ मोडणे, लाद्या फुटणे आदी प्रकारही या टँकरमुळे पणजीकरांना सहन करावे लागत आहेत. साळगाव प्रकल्पात अडवणूक होत असल्याने आमची सहनशक्ती संपली, त्यामुळेच बुधवारी टोंका प्रकल्पात उत्तर गोव्यातून दुपारी आलेले 22 आणि संध्याकाळपर्यंत आलेले 6 असे मिळून 28 टँकर्स परत पाठवण्यात आले. आम्ही टँकर स्वीकारणे बंद केल्याचे कळल्याने आणखी टँकर दाखल झाले नाहीत.

मडकईकर म्हणाले, या आधी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्या उपस्थितीत पणजी-ताळगावचा ओला कचरा साळगाव प्रकल्पात प्रक्रियेसाठी नेण्यास परवानगी देण्यात आली होती. यामुळे ताळगावचा एक आणि पणजी शहरातून दोन असे मिळून तीन ट्रक ओला कचरा साळगाव कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी नियमीत पाठवला जात होता. मात्र, सोमवारपासून गेले तीन दिवस आमचे ट्रक सदर साळगाव प्रकल्पाच्या गेटवर अडवण्यात आले. पणजीचा ओला कचरा घेऊन मंगळवारी साळगाव प्रकल्पात गेलेला ट्रक; आच्छादन, घाण पाणी गोळा करणारे टँक असूनही दिवसभर ठेवण्यात आला. हे ट्रक कशाला अडवले हे विचारण्यासाठी साळगाव प्रकल्पाचा अधिकारी डॉमनिक याच्याशी संपर्क साधला असता त्याने आपला फोनही स्वीकारला नाही. हाच अधिकारी मांडवीतील कॅसिनोतील घाण पाणी साळगाव प्रकल्पात प्रक्रियेसाठी नेण्यात अधिक रस दाखवत होता. जर कॅसिनोंच्या ट्रकांना सदर प्रकल्पात प्रवेश दिला जातो, तर पणजी- ताळगाव लोकांकडून आलेला ओला कचरा का स्वीकारला जात नाही, याचे आपल्याला उत्तर मिळायला हवेे. 

मंत्री मायकल लोबो आणि स्थानिक आमदार जयेश साळगावकर यांच्यामध्ये काय राजकीय वैर सुरू आहे त्याची आपल्याला कल्पना नाही, आणि माहिती घेण्याची गरजही नाही, असे त्यांनी सांगितले.

‘...तर पणजीत कचर्‍याचे ढीग’ 

पणजीत पर्यटक तसेच सर्व गोव्याच्या कानाकोपर्‍यातून लोक आपल्या कामासाठी येतात. याचा अर्थ, हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणांहून निर्माण होणारा ओला कचरा पणजीकरांपेक्षा अन्य लोकांकडून तयार होतो. पणजी मनपाकडून ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात असून आणखी तीन लहान कचरा प्रकल्प चार महिन्यांत बांधून पूर्ण होणार आहेत. आता, सदर ओला कचरा शहरातून नेण्यास अपयश आले, तर राजधानीत कचर्‍याच्या राशी आणि रोगराई पसरण्याची भीती असून तसे झाल्यास त्याला राज्य प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिला.