Tue, May 26, 2020 09:25होमपेज › Goa › मडगावात 200 विद्यार्थी  11 वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

मडगावात 200 विद्यार्थी  11 वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:48AMपणजी : वसंत कातकर

यंदा गेल्या मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत 17, 887  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अनेक विद्यार्थ्यांना 11 वीच्या वर्गात प्रवेश मिळणे कठीण बनले आहे. राज्यातील अन्य तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक महाविद्यालयात प्रवेश मिळाला  असला तरी मडगावातील सुमारे 200  विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.   या माहितीला दुजोरा देऊन  शिक्षण संचालक गजानन भट म्हणाले, की प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये  विद्यार्थ्यांची गर्दी झाली असून अतिरिक्‍त विद्यार्थ्यांना मडगाव शहरातील पाच महाविद्यालयांच्या 11 वीच्या वर्गाची क्षमता वाढवून तिथे सामावून घेण्यात येणार आहेे. 

यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल 91.27 टक्के  लागला.   परीक्षा दिलेल्या 19 हजार 596 विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण झाले असून  यामध्ये 9 ,009 मुले तर 9,133 मुली मिळून 17 हजार 887 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना 11 वीसाठी विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक आदी शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागली आहे.  मडगाव, पणजी, म्हापसा, फोंडा, वास्कोसारख्या शहरांतील महाविद्यालयात प्रवेशासाठी   विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. 

शिक्षण संचालक भट  म्हणाले, की  राज्यातील सर्व महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली असून बहूतांश विद्यार्थ्यांना  त्यांना  अपेक्षित शाखेत प्रवेश मिळाला आहे. मात्र, सासष्टी तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचा ओढा मडगावातील  महाविद्यालयांकडेच असल्याने काहीशी समस्या निर्माण झाली आहे. मडगावातील विविध महाविद्यालयातील अनेक शाखेत मिळून सुमारे 200  विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेत प्रवेश घेता आला नसल्याच्या तक्रारी खात्याकडे आल्या आहेत. त्यावर प्रत्येक महाविद्यालयाच्या   वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढवून या 200 विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.
काहीसा असाच प्रकार पहिली ते दहावी पर्यंतच्या शालेय प्रवेशसाठीही झाला आहे. प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला घरापासून एक- दोन किलोमीटर अंतराच्या आतील शाळेत प्रवेश देण्याचे परिपत्रक शिक्षण संचालनालयाने काढले होते. राज्यभरात असे जवळच्या शाळेत प्रवेश न मिळालेल्या सुमारे 40 विद्यार्थ्यांच्या पालकांनी खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती गोवा अशा तीन केंद्रातील शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या पडताळून या 40 विद्यार्थ्यांना घरापासून जवळच्या शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रीया पार पडल्याची माहिती संचालक भट यांनी दिली.