Thu, Jul 02, 2020 15:53होमपेज › Goa › वेर्ण्यात २० लाखांचे हस्तिदंत जप्त; मडगावच्या दोघांना अटक

वेर्ण्यात २० लाखांचे हस्तिदंत जप्त; मडगावच्या दोघांना अटक

Published On: Mar 21 2019 12:57AM | Last Updated: Mar 20 2019 11:43PM
दाबोळी : प्रतिनिधी

वेर्णा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत श्रीकांत घाणेकर (वय 42, रा. दवर्ली- मडगाव) आणि विघ्नेश कारापूरकर (29, आके-मडगाव) या दोघांना वेर्णा येथून अटक करून त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीचे दोन हस्तिदंत (सुळे) जप्त केले. दोघाही संशयितांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेजण हस्तिदंत घेऊन मडगावच्या दिशेने जाणार असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना रात्री उशिरा मिळाली, त्यानुसार वेर्णा पोलिसांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ मोक्याच्या ठिकाणी सापळा रचून पाळत ठेवली होती. रात्री 9 च्या सुमारास वेर्ण्याकडून मडगावकडे जाणारी संबंधित कार वेर्णा पोलिसांच्या नजरेस पडताच ती थांबविण्यात आली.  या कारमध्ये त्यावेळी दोघेजण असल्याचे आढळले. त्यांच्याकडे चौकशी करून कारची झडती 

घेतली असता कारमध्ये दोन हस्तीदंत मिळाले. सुमारे 3 किलो 10 ग्राम वजनाचे हस्तिदंत कोठून आणले,अशी विचारणा करून त्यांच्या कागदपत्रांची मागणी केली असता,संशयित ते सादर करु शकले नाहीत. त्यानुसार वेर्णा पोलिसांनी  त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले. तेथे पंचनामा करुन त्यांच्या विरोधात वन्य प्राणी संवर्धन कायदा 1972 च्या कलम 9,39,40,42 51 नुसार गुन्हा नोंदवला.

सदर कारवाई निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, हवालदार नेव्हील फर्नांडिस, पोलिस शिपाई विदेश नाईक  आदींच्या पथकाने केली. याप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य संशयितांचा  शोध वेर्णा पोलिस  घेत आहेत.