Tue, May 26, 2020 04:46होमपेज › Goa › पश्चिम आफ्रिकेत वीस भारतीय खलाशांचे अपहरण

पश्चिम आफ्रिकेत वीस भारतीय खलाशांचे अपहरण

Last Updated: Dec 19 2019 1:55AM
मडगाव : प्रतिनिधी 

पश्चिम आफ्रिकेच्या गल्फ ऑफ जुईनीया येथे समुद्री चाच्यांकडून 20 भारतीय खलाशांचे अपहरण करण्यात आले असून त्या मालवाहू जहाजात चार गोमंतकीय खलाशांचा समावेश असल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. गेल्या रविवारपासून इतर खलाशांबरोबर कुंकळ्ळी, आंबेली आणि चिंचोणे येथील चार जणांना समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवले आहे.

या चारही युवकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असून सर्वांच्या कुटुंबीयांना ते काम करत असलेल्या जहाजाच्या कंपनीने मुंबईत बोलावले आहे. इन्शुरन्स जर्नल या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, सदर खलाशी काम करत असलेल्या जहाजाचे नाव एमटी ड्यूक असे आहे. सदर मालवाहू जहाजातून इंधनाची वाहतूक केली जात होती. रविवारी अंगोला ते टोगो समुद्री वाटेवर प्रवास करताना लंडनच्या वेळेनुसार, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास समुद्री चाच्यांनी जहाजावर हल्ला करून त्यावर काम करणार्‍या खलाशांचे अपहरण केले आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, एक खलाशी वगळता इतर सर्वांचे अपहरण करून त्यांना ओलिस ठेवण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, एकूण 21 खलाशी जहाजावर कामाला होते. त्यातील 20 भारतीय नागरिक आहेत.एका नायजेरियन खलाशाला सोडून इतर वीसही भारतीयांचे अपहरण करण्यात आलेले आहे. 

दरम्यान, दक्षिण गोव्यातील चार खलाशांची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.आम आदमी पक्षाचे नेते कॅप्टन वेंजी व्हिएगस यांनी राज्य सरकारने सुद्धा या विषयात लक्ष घालून ओलिस ठेवलेल्या गोमंतकीय खलाशांच्या सुटके साठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.