होमपेज › Goa › ‘दाबोळी’वर १९ लाखांचे विदेशी चलन जप्‍त

‘दाबोळी’वर १९ लाखांचे विदेशी चलन जप्‍त

Published On: Jan 03 2019 12:35AM | Last Updated: Jan 03 2019 12:06AM
दाबोळी : प्रतिनिधी

 दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकार्‍यांनी प्राप्त माहितीच्या आधारे बुधवारी केलेल्या कारवाईत एअर इंडिया (एआय 993) या विमानातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या प्रवाशाकडून 19 लाखांचे विदेशी चलन जप्त केले.

कस्टम आयुक्‍त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू-गोवा मार्गे दुबईला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानातून एक प्रवासी विदेशी चलन घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. खात्याच्या अधिकार्‍यांनी त्यावर पाळत ठेवून सदर विमान विमानतळावर उतरताच संशयित प्रवाशाची झडती घेतली.तपासात अंतर्वस्त्रात विदेशी चलन लपवल्याचे आढळून आले. भारतीय चलनानुसार त्याची किंमत 19 लाख इतकी होते. सदर कारवाई कस्टम उपायुक्त डॉ.राघवेंद्र यांनी आयुक्‍त आर.मनोहर तसेच अतिरिक्‍त आयुक्त टी.आर.गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.