Wed, Jul 08, 2020 12:22होमपेज › Goa › सरकारी प्राथमिक शाळांत लवकरच १८२ शिक्षक भरती

सरकारी प्राथमिक शाळांत लवकरच १८२ शिक्षक भरती

Published On: Jul 23 2019 1:17AM | Last Updated: Jul 23 2019 1:17AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये असलेली शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासाठी 182 शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिली. प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती केल्यानंतर येत्या सहा महिन्यांत सरकारी उच्च माध्यमिक शाळांमध्येही शिक्षकांची भरती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी सांगे येथील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमरता असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील विविध सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 182 शिक्षकांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली असून यासाठी उमेदवारांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक मुद्द्यामुळे त्याच्या अंमलबजावणीस 20 ते 25 दिवसांचा विलंब झाला. येत्या आठ दिवसांत हे सर्व 182 प्राथिमक शिक्षक सेवेत रुजू होतील, असे त्यांनी सांगितले.ज्या शाळेत 22 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असतील तेथे दोन शिक्षकांची नेमणूक केली जाईल. या शिक्षक भरतीमुळे कमतरता भरुन निघेल. त्याचबरोबर सरकारी उच्च माध्यमिकशाळांमध्येही शिक्षकांची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या सहा महिन्यांत उच्च माध्यमिक शाळांमध्येही शिक्षकांची भरती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

काही सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी असल्याने शाळा बंद करुन विद्यार्थ्यांना सरकारी अनुदानीत शाळांमध्ये हलवण्याची पालकांकडून मागणी केली जात आहे. मात्र, तसा निर्णय घेतल्यास सरकारवर काही घटक सरकारी शाळा बंद केल्याचा आरोप करतात. त्यामुळे सरकारी शाळेचे सरकारी शाळेतच विलीनीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, त्याला पालकांनी विरोध करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.