Thu, May 28, 2020 05:42होमपेज › Goa › राज्यात पावसाळ्यापूर्वी 18,518 बायोटॉयलटस् ः मुख्यमंत्री

राज्यात पावसाळ्यापूर्वी 18,518 बायोटॉयलटस् ः मुख्यमंत्री

Last Updated: Feb 06 2020 1:49AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

पावसाळ्यापूर्वी राज्यात  18,518 बायोटॉयलेट उभारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत  प्रश्‍नोत्तर तासात  फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर  दिली.  

राज्य सरकारकडून  ठिकठिकाणी उभारण्यात येणार्‍या बायोटॉयलेटचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे असा प्रश्‍न आमदार नाईक यांनी  विचारला होता. आमदार नाईक म्हणाले, की सरकारकडून  बायोटॉलयेट उभारली जाणार होती. त्यानुसार  फोंडा तालुक्यात  472  बायोटॉयलेट उभारण्याची प्रक्रिया हाती घेतली गेली, मात्र त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या सर्व बायोटॉयलेटचे काम सुरु असल्याची माहिती  सरकारकडून  देण्यात आली.

राज्यात फोंडा तालुक्यात   170 लोकांनी   बायोटॉयलेटसाठी गट विकास कार्यालयात   अर्ज केले होते. या अर्जदारांनी 2017 साली सुमारे 6 लाख 2 हजार 500 रुपये जमा केले होते. मात्र,  अजूनही त्यांना  टॉयलेट मिळाली नसल्याचे त्यांनी  सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की गोवा हागणदारीमुक्‍त जाहीर करण्यात आला असला तरी   अजूनही प्रत्येकाच्या   घरात टॉयलेट देण्यात आलेले नाही. राज्यभरातून   सरकारकडे आतापर्यंत   बायोटॉयलेटसाठी 18 हजार 518 अर्ज  आले आहेत.   बायोटॉयलेट उभारण्यासाठी चार कंत्राटदारांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सर्व बायोटॉयलेट पावसाळ्यापूर्वी म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यांपर्यंत उभारण्यात येतील. ज्यांना या बायोटॉयलेटची गरज आहे त्या सर्वांना ती दिली जाईल.

बायोटॉयलेट उभारण्यासाठी सरकारकडून माफक शुल्क आकारले जाते. सर्वसाधारण व ओबीसीकडून  बायोटॉयलेट उभारण्यासाठी  अडीच हजार रुपये तर  एसी व एसटी वर्गासाठी   1 हजार रुपये  इतके शुल्क आकारले जाते.  एक बायोटॉयलेट उभारण्यासाठी सुमार 54 हजार रुपये इतका खर्च आहे. बायोटॉयलेट उभारल्यानंतर  पुढील तीन वर्षासाठी  त्याची  देखभालीची जबाबदारी ही कंत्राटदाराचीच असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.