Thu, May 28, 2020 06:38होमपेज › Goa › गोव्यात ११ लाख मतदार

गोव्यात ११ लाख मतदार

Published On: Feb 03 2018 2:25AM | Last Updated: Feb 03 2018 12:32AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील मतदारांची नवी यादी जाहीर झाली असून एकूण मतदार संख्या आता 11 लाख 19 हजार 777 इतकी झाली आहे. गोव्याच्या मतदार यादीतून प्रथमच एकूण 13 हजार 431 लोकांनी स्वत:हून आपली नावे रद्द केली आहेत. या यादीत नव्या 8 हजार 816 मतदारांची भर पडली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या वेळी राज्यात मतदारांची एकूण संख्या 11 लाख 10 हजार 961 इतकी होती. त्यात 5 लाख 46 हजार पुरुष व 5 लाख 64 हजार 470 महिला मतदारांचा समावेश होता. पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असून आता नव्या यादीत महिला मतदारांची एकूण संख्या 5 लाख 69 हजार 884 झाली आहे. तीन हजार नव्या पुरुष मतदारांची भर पडून त्यांची संख्या 5 लाख 49 हजार इतकी झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

मतदार यादीतून आपले नाव रद्द करावे म्हणून ताळगाव मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 614 अर्ज आले. नावेली मतदारसंघातून 128 अर्ज आले. नव्याने नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी फोंडा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 889 अर्ज आले. सर्वात कमी म्हणजे 357 अर्ज कळंगुट मतदारसंघातून आले. 

सर्वाधिक मतदार वास्को मतदारसंघात असून तिथे एकूण 35 हजार 922 मतदार आहेत. सर्वात कमी मतदारसंख्या सांतआंद्रे मतदारसंघात झाली आहे.  तिथे 20 हजार 844 मतदार झाले आहेत. मुरगाव मतदारसंघात महिला मतदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे 10 हजार 443 आहे. नवी मतदारसंख्या कुठ्ठाळीत सर्वाधिक वाढली. तिथे 660 मतदारांची भर पडली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विदेशात स्थायिक नागरिकांची नावे रद्द

जे गोमंतकीय विदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतात, त्यांची नावे मतदार यादीतून निवडणूक आयोगाकडून काढून टाकली जातात. तथापि, यावेळी 14 हजार 384 गोमंतकीयांनी स्वत:हून निवडणूक आयोगाकडे अर्ज केले व मतदार यादीतून नावे रद्द करण्याची विनंती केली. या 14 हजारांपैकी 13 हजार 431 अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारले व नावे मतदार यादीतून रद्द केली.