Mon, May 25, 2020 13:35होमपेज › Goa › खाण, पर्यटनात सुधारणा झाल्यास सहा महिन्यांत ‘स्वयंपूर्ण गोवा’ : मुख्यमंत्री

खाण, पर्यटनात सुधारणा झाल्यास सहा महिन्यांत ‘स्वयंपूर्ण गोवा’ : मुख्यमंत्री

Last Updated: May 16 2020 1:11AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजचा फायदा गोव्यातील 20 हजार ‘लघू व मध्यम उद्योगांना’(एमएसएमई) मिळणार आहे. राज्यातील पर्यटन, बांधकाम, कृषी व ‘आयटी’ उद्योगांनाही आधीच्या कर्ज रकमेच्या 20 टक्के अतिरिक्त कर्ज पुन्हा कागदपत्रे न देता, दिले जाणार आहे. राज्यातील खाण, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात सुधारणा झाल्यास सहा महिन्यांत ‘स्वयंपूर्ण गोवा’ आकारास येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे सचिवालयात राज्यातील ‘आरबीआय’ व खासगी बँक अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यस्तरीय बँक समितीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली.या बैठकीत ‘आरबीआय’चे प्रमुख अधिकारी तसेच ‘स्टेट बँके’चे राजीव कुमार यांच्यासहीत राज्यातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेखाली ज्येष्ठ नागरिक, विधवा, एकाकी महिला, दिव्यांग यांना दिले जात असलेले मासिक मानधन वेळेवर देण्यास सांगण्यात आले. केंद्र सरकारने स्वयंसेवी गटाला (एसएचजी) दिल्या जात असलेल्या विनातारण कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपयांपर्यंत करण्यास मान्यता दिली असून याचा फायदा राज्यातील तीन हजार ‘एसएचजी ’ गटातील महिलांना मिळणार आहे. केंद्र सरकारने आयकर आणि ‘जीएसटी’ भरण्यासाठीही मुदतवाढ दिली असून ग्राहकांना मदत करण्याची सूचना बँकांना या बैठकीत देण्यात आली आहे. 

राज्यातील ग्रामीण भागातील विविध लहान आणि कुटीर उद्योगांनाही विनातारण कर्ज देण्याची राज्यातील राष्ट्रीय व खासगी बँकांनी तयारी दाखवली आहे. खाण व पर्यटन उद्योगाला पुन्हा गती दिली जाणार असून या क्षेत्रातील उद्योगांना आर्थिक मदत करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे 2 हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची मागणी करण्यात आली आहे. यामुळे, पर्यटन क्षेत्रात गोवा पुन्हा देशात व जागतिक पातळीवर क्रमांक एकवर येणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्‍त केला.