Fri, May 29, 2020 21:01होमपेज › Goa › सरकारमधील घटक पक्षांत असंतोषासाठी ‘मगो’ ची याचिका

सरकारमधील घटक पक्षांत असंतोषासाठी ‘मगो’ ची याचिका

Published On: Nov 22 2018 1:13AM | Last Updated: Nov 22 2018 12:33AMपणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने माजी काँग्रेस आमदारांविरोधात न्यायालयात सादर केलेल्या याचिकेमागे आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण करावी, असा हेतू आहे.  भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नसून ‘मगोप’वर  सदर याचिका मागे घेण्याचा दबावही टाकण्याचा प्रश्‍नच नाही. त्या याचिकेला भाजप योग्य ते उत्तर न्यायालयातच देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

‘मगोप’ने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो. ‘मगोप’वर आम्ही याचिका मागे घेण्यासाठी कसलाच दबाव टाकत नाही. त्या पक्षाने याचिका मागे घ्यावी, अशी आम्ही विनंती देखील करत नाही. न्यायालयच काय तो निवाडा देईल, असे तेंडुलकर म्हणाले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे विविध विधाने करून लोकांची करमणूक करत आहेत.दीपक ढवळीकर हे हास्यास्पद बोलत व वागत आहेत. मगो पक्षातच फूट पडेल,असे कदाचित त्यांना  वाटत असावे व त्यामुळे न्यायालयात धाव घेतली गेली असण्याची शक्यता आहे, असे तेंडूलकर म्हणाले.  

तेंडुलकर म्हणाले, की सरकारचे काम चांगले चालले आहे. मंत्री सुदिन ढवळीकर हेही सरकारमध्ये चांगले काम करत आहेत.   सुदिन ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने बुधवारी आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही, पण पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर व आमदार दीपक प्रभू पावसकर या दोन्ही मगो  नेत्यांशी आम्ही बोललो. ते सरकारसोबतच आहेत. त्यांची काही तक्रार नाही.      

ज्येष्ठ मंत्र्याकडे मुख्यमंत्रिपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी मगो पक्ष करत असल्याविषयी पत्रकारांनी  विचारले असता तेंडूलकर म्हणाले, की आम्ही केंद्रीय नेत्यांच्या रोज संपर्कात असतो . भाजपचे केंद्रीय नेतृत्व च योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल. भाजपचे सर्व आमदार पुढील विधानसभा अधिवेशनावेळी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे तीन-चार आमदार असाध्य आजारामुळे अंथरुणास खिळलेले आहेत, असे मगोपने याचिकेत म्हटले असले तरी आमचे आमदार सुस्थितीत  आहेत,असे सांगून आगामी अधिवेशनात ते सर्व विधानसभेत हजेरी लावतील, असा विश्‍वास तेंडूलकर यांनी व्यक्त केला.  

मगोपने लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला असल्याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाले, की सुदिन ढवळीकर हे मगोपचे विधिमंडळ गटाचे नेते आहेत. मगोकडून लोकसभा निवडणुकीवेळी व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही भाजपला सहकार्य मिळेल. काँग्रेसविरुद्ध केवळ भाजपचेच उमेदवार असतील,असे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्‍वास असून  मगोपचे उमेदवार रिंगणात नसतील, याची काळजी मंत्री सुदिन ढवळीकर घेतील. या पत्रकार परिषदेत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि सरचिटणीस सदानंद तानावडे  उपस्थित होते. 

याचिकेचा निर्णय एकट्याचा नाही : दीपक ढवळीकर

पक्षांतर करणार्‍या आमदारांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय हा एकट्या  सुदिन वा दीपक ढवळीकर यांचा नाही. हा पूर्णपणे मगोच्या केंद्रीय कार्यकारिणीचा अंतिम निर्णय आहे. भाजपने केलेल्या  विधानाबद्दल कार्यकारिणीतच चर्चा होऊन त्यावर पुढील पावले टाकली जातील,असे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

मोर्चात काँग्रेसचे पाच आमदार गैरहजर का? : तेंडुलकर

काँग्रेस पक्ष आणि तथाकथित बुद्धिजीवी लोकांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निवासस्थानावर काढलेल्या मोर्चाचा भाजपतर्फे निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यभरातील अवघ्या 60 ते 70 लोकांचा जमाव जमवण्यात आला असून आंदोलनकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. या मोर्चात काँग्रेसच्या 14 पैकी फक्त 9 आमदार उपस्थित होते. मात्र बाकीचे पाच आमदार गैरहजर का राहिले होते याची काँग्रेसनेच चौकशी करण्याची गरज असल्याचा टोमणा तेंडुलकर यांनी मारला.