Mon, May 25, 2020 10:05होमपेज › Goa › ‘होम क्‍वारंटाईन’ युवक फळे विकताना आढळल्याने खळबळ 

‘होम क्‍वारंटाईन’ युवक फळे विकताना आढळल्याने खळबळ 

Last Updated: Mar 31 2020 11:36PM
मडगाव ः पुढारी वृत्तसेवा

होम क्‍वारंटाईन केलेल्या व्यक्‍ती नियमांचे पालन न करता उघडपणे समाजात वावरू लागल्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. कुडचडेत क्‍वारंटाईन केलेला युवक चक्‍क फळविक्री करू लागला असून जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीला आला. बाणसाय येथे फळविक्री करणार्‍या या युवकाला चौदा दिवस होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. सदर युवक आपल्या घरात फळविक्री करू लागल्याचे समोर येताच लोकांनी याची माहिती कुडचडे पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला लोकांच्या संपर्कापासून दूर राहण्याबाबत तंबी दिली आहे.

होम क्‍वारंटाईन केलेल्या युवकाला लोकांच्या संपर्कात न येण्याची सूचना सरकारने केलेली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. विदेशातून आलेल्या लोकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलेले आहे. त्यांना लोकांच्या संपर्कात येण्यापासून दूर राहण्यासाठी 14 दिवस घरीच राहण्याची सूचना देण्यात आलेली आहे. पण क्‍वारंटाईन केलेल्या व्यक्‍ती स्वतः बेजबाबदारपणे वागू लागल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सविस्तर माहितीनुसार, कुडचडेत होम क्‍वारंटाईन करण्यात आलेला युवक आपल्या परिवारासह बाणसाय येथे वास्तव्याला आहे. त्याचा फळविक्रीचा व्यवसाय असून क्वारंटाईन असूनही तो फळविक्रीच्या निमित्ताने दररोज कित्येक लोकांच्या संपर्कात येत आहे. मंगळवारी सकाळी कुडचडे भागातील युवक फळांची खरेदी करण्यासाठी बाणसाय येथे गेले असता कलिंगडाची टोपली घेऊन तो युवक त्यांच्यासमोर आला. क्वारंटाईन केल्याचा हातावरील शिक्का लोकांना दिसू नये, यासाठी त्याने लांब बाह्याचा शर्ट घातला होता.

पण कलिंगडाची टोपली ठेवताना युवकांना त्याच्या हातावरील शिक्का दिसून आल्यामुळे ते सतर्क झाले आणि त्यांनी त्या शिक्क्याबद्दल त्याला विचारणा केली. सुरुवातीला त्याने क्वारंटाईन करण्यात आल्याचे नाकारले, पण सदर युवकांनी पोलिसांना याची माहिती देताच त्याने आपण क्वारंटाईन असल्याचे मान्य केले. चेतन कोठारकर यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या युवकाने क्वारंटाईनचा शिक्का पुसून टाकण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण रेल्वेने येताना हा शिक्का आपल्या हातावर मारण्यात आल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती कुडचडे पोलिस आणि 104 हेल्पलाईन क्रमांकावर देण्यात आली असता कुडचडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक वैभव नाईक यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तो युवक धारवाड येथे आपल्या मूळ गावी गेला होता. त्याला तेथून पुन्हा गोव्यात पाठण्यात आले. गेल्या रविवारी तो गोव्यात दाखल झाला आहे. त्याला क्वारंटाईन करण्यात आले असून त्याने 14 दिवस घरी राहण्याची आवश्यकता होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब येऊन त्याची तपासणी केली असून त्याला क्वारंटाईनचा अवधी पूर्ण होईपर्यंत घरात राहण्याची सूचना दिल्याची माहिती नाईक यांनी दिली